नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा बुरखा पुन्हा एकदा उतरला आहे; त्यांना संविधान नको तर ‘मनुस्मृती’ हवी आहे, अशा शब्दांत संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांच्या वक्तव्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाचार घेतला. (Rahul takes jab on RSS)
संघाचे सरचिटणीस होसबाळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दांचा आढावा घेण्याची मागणी केली. ते शब्द काढून टाकले पाहिजेत, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२७ जून) प्रत्युत्तर दिले. संघाचा बुरखा पुन्हा एकदा उतरला आहे कारण त्यांना संविधान नको तर ‘मनुस्मृती’ हवी आहे, अशी टीका त्यांनी केली. (Rahul takes jab on RSS)
‘‘आरएसएसचा मुखवटा पुन्हा उतरला आहे. संविधान त्यांना मान्य नाही. कारण ते समता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाबद्दल बोलते,’’ असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘‘आरएसएस आणि भाजपला संविधान नको आहे, त्यांना ‘मनुस्मृती’ हवी आहे. उपेक्षित आणि गरिबांचे हक्क हिरावून घेऊन त्यांना पुन्हा गुलाम बनवण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांच्याकडून संविधानासारखे शक्तिशाली शस्त्र हिसकावून घेणे हा त्यांचा खरा अजेंडा आहे,’’ असा आरोपही त्यांनी केला.
‘‘आरएसएसने हे स्वप्न पाहणे थांबवावे. आम्ही ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही. प्रत्येक देशभक्त भारतीय त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल,’’ असे श्री. गांधी यांनी ठामपणे सांगितले. (Rahul takes jab on RSS)
आणीबाणीवर आयोजित एका कार्यक्रमात गुरुवारी बोलताना श्री. होसबाळे म्हणाले, ‘‘बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत हे शब्द कधीच नव्हते. आणीबाणीच्या काळात जेव्हा मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली गेली, संसदेचे काम ठप्प झाले, न्यायव्यवस्था लंगडी झाली, तेव्हा या शब्दांचा अंतर्भाव करण्यात आला.’’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस होसबाळे म्हणाले की या मुद्द्यावर नंतर चर्चा झाली परंतु प्रस्तावनेतून ते शब्द काढून टाकण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. म्हणून ते शब्द प्रस्तावनेतच असावेत की नाही याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
‘‘प्रस्तावना शाश्वत आहे. पण भारतासाठी विचारसरणी म्हणून समाजवादाचे विचार शाश्वत आहेत का?’’ असा सवालही श्री. होसाबळे यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा :
‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकावेत : होसबाळे
होसबाळेंचे वक्तव्य लोकशाहीवरील हल्ला : लालू प्रसाद