माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं नुकतंच निधन झालं. ते घटनात्मक पदावर राहिल्यानं प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं. ते झालं नाही. त्याचं कारण अर्थात सर्वांसमोर आहे. मलिक यांच्या पत्नी डॉ. इकबाल या पर्यावरणवादी कार्यकर्त्या, संशोधक, प्राध्यापक. त्यांनी मलिक यांना लिहिलेलं हे हृदयस्पर्शी पत्र. त्याचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला स्वैर अनुवाद. (Satyapal Malik)
प्रिय,
सत्यपाल,
मी या दिवसाचा कधी विचारच केला नव्हता. खरंतर मी आधी जाणार होते. पण तू माझ्याआधी निघून गेलास.
नुकतीच विद्युत स्मशानभूमीतून परतलेय. तू गेल्याचं कुणालाही औपचारिक निमंत्रण दिलेलं नव्हतं, ना कुठली घोषणा! तरीही बातमी पोचली. हृदयानं हृदयापर्यंत ती पोचवली. लोक आले. काही मनाने, काही श्रद्धेने तर काही निःशब्द होऊन. (Satyapal Malik)
या सर्व लोकांसाठी तू केवळ एक नेता नव्हता तर दिशा होतास. एक स्थिर, सच्ची आणि शांतपणे सत्याकडे अंगुलीनिर्देश करणारी.
आलेले लोक केवळ तुझे मतदार नव्हते.. ना तू त्यांचा फक्त लोकप्रतिनिधी होतास. तू त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य होतास. तू त्यांची नावं लक्षात ठेवलीस, अगदी त्यांचं नसणंही! पिकांचा हंगाम असेल, आजारपण, आंदोलन… प्रत्येक वळणावर तू त्यांच्यासोबत उभा राहिलास. छोट्या-छोट्या स्वप्नांमध्येही त्यांचा आधार झालास.(Satyapal Malik)
स्मशानात मी सुन्न होते. शांत, असहाय्य, तुटलेली. जसं काही सगळंच हरवलं आहे. खरंतर शब्दच फुटत नव्हते.
कॉलेजचा तो पहिला दिवस मला आज प्रकर्षाने आठवत होता. त्याच दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलेलं. मी गेटवर पोचताच तू शांतपणे म्हणालेलास, ‘आज विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, परत जा.’ मी काही तेव्हा तुझं ऐकलं नव्हतं. तेव्हा कुठं माहीत होतं की, हाच माणूस एकेदिवशी आपला जीवनसाथी बनेल. (Satyapal Malik)
आपल्या दोघांमध्येही कधीच वरचढ वृत्ती नव्हती. होता तो फक्त आदर, आपुलकी. एकमेकांना दिलेली ‘स्पेस’ही! आपण दोघांनी मिळून स्वप्नांसाठी जागा बनवली. कधी तू माझं ओझं हलकं केलंस, कधी मी तुझं. प्रत्येक वादळात तू माझ्यासोबत ठाम उभा होतास.
तुझ्याकडून मी समाजवाद शिकले. केवळ विचारसरणी किंवा मोर्चांसाठी नाही तर जीवनमार्ग म्हणून. तुझा समाजवाद तर तुझ्या चालण्यात, खाण्यात, अगदी शेवटच्या रांगेत उभं राहण्यातही होता. तुझ्या स्पर्शात सहजता होती आणि तत्त्वांमध्ये दृढता. जी क्वचित कुणात पहायला मिळायची. तू निर्भय, निर्मळ होता.
राज्यपाल झाला तेव्हाही तेच व्यंगात्मक हास्य करत म्हणालास, ‘मी अजूनही तोच माणूस आहे. फक्त माझ्या आजूबाजूचे लोक साहेबांसारखे वागतायत.’ (Satyapal Malik)
तुझ्या कविता, किस्से, गावातील गोष्टी, मजूर-शेतकऱ्यांचं दुःख. तू प्रत्येकासोबत होतास. सर्वांचा आपला बनून.
तू विद्यार्थी, शेतकरी, खेळाडू यांच्या पाठीशी राहिला. जवान आणि पोलिस यांचा आदर केला. आज हे सगळेच तुझी आठवण काढतायत. ईडीचे अधिकारी छापे टाकण्यासाठी आले तेव्हाही तू त्यांना आदर दिलास. भीतीने नव्हे, तर लोकशाही संस्थांवर अढळ विश्वास म्हणून.
तू शांत, संयमी, साधं आणि परिपूर्ण आयुष्य जगलास. आज तुझा मुलगाही तितक्याच शांततेनं आणि मोठ्या धैर्याने तुझे विचार पुढे नेतोय. तुझी सून तुझा अभिमान वाढवतेय. आणि मी तुझ्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालीय तिच्याशी लढते आहे. सकाळच्या नीरव शांततेत, दुपारच्या स्थिरतेत आणि संध्याकाळच्या प्रतिक्षेत! तुझी वाट पाहत.
इथून पुढे आम्ही सगळेच आपआपल्या पद्धतीनं तुझा गौरव वाढवत राहू. त्याच प्रेमानं जे अनंत आहे, अपार आहे. आणि मौनात वाढते आहे.
तुझी,
इकबाल