मुंबई : प्रतिनिधी : गंभीर आजारपणावर उपचार घेत असलेले शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पत्रकार परिषत घेतली. त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना शिंदे गटांवर सडकून टीका केली. एक दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच शिंदे सेनेचा कोथळा बाहेर काढतील अशी टीका करुन ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला टीकेच्या तोफेला बत्ती लावली आहे.
शिवसेनेचे ३५ आमदार फुटतील
शिंदेंच्या कार्यपद्धतीवर खासदार राऊत यांनी टीका केली. शिवसेनेचे ३५ आमदार फुटतील असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, ज्या प्रमाणे शिंदे यांनी शिवसेना फोडली त्याच प्रमाणे शिंदेचे आमदार फोडण्याचे व्यवस्थित काम सुरू आहे. त्यासाठी रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे. दिल्लीचे दोन नेते आपल्यासोबत आहेत असे शिंदे वाटत असले तरी ते कुणाच्याही पाठीशी नाहीत. त्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे मागे पुढे न पाहणाऱ्यांच्यापुढे शिंदे कोण? असा सवालही त्यांनी केला. (Sanjay Raut returns)
नगरपालिका निवडणूकीत प्रथमच प्रचंड पैशाचा खेळ
खासदार राऊत निवडणुकीतील आर्थिक उलाढालीवरही भाष्य केले. ते म्हणाले, नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीने सुरू आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशांचा इतका प्रचंड खेळ कधीच झाला नव्हता. मुळात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हती. स्थानिक पातळीवरच लोक निवडणुका लढवत होते. पण आता पाच-सहा हेलिकॉप्टर्स, खासगी विमानं हे सगळं पाहायला मिळत आहे. परंतु आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांवर निवडणुका सोडल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत, पण तसं मुळीच नाही. तर या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. कारण मागच्या चार ते पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. सध्याच्या घडीला ‘तू मोठा की मी मोठा’ अशी स्पर्धा तीन सत्ताधारी पक्षांमध्ये चालली आहे, असे म्हणत राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. (Sanjay Raut returns)
राऊत यांच्याकडून निलेश राणे यांचे अभिनंदन
मालवण मधील भाजपच्या पैसे वाटपाचा घोटाळा बाहेर काढल्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले. कोकणात निवडणुकीत पैसे कसे वाटप करताना हे आमदार राणेंनी दाखवले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. भाजपबरोबर शिवसेना शिंदे गटही डबल पैसे वाटतो, असेही ते म्हणाले. पैसे वाटपचे प्रकरण गैरव्यवहार उघडकीस करणाऱ्या आमदार राणेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. (Sanjay Raut returns)