भाजपाचे खासदार नेते आणि अभिनेते रवि किशन यांनी संसदेत समोसा खाद्यपदार्थांच्या किमती आणि आकाराबद्दल काही अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदींना नेमका कोणकोणत्या बाबीत अधिक इंटरेस्ट आहे, याचे योग्य आकलन असणारे ते एकमेव भाजपा नेते आणि अभिनेते आहेत, याबद्दल माझी खात्री पटली आहे. भारताची संरक्षण सिद्धता, आतंकी हल्ल्यापासून सरंक्षण, ऑपरेशन सिंदूर, बिहारमधील निवडणूक आयोगाचे कार्य यांसारख्या अनेक विषयावर चर्चा करत संसदेचा वेळ व्यर्थ जात असताना त्यांनी समोसा या खाद्यपदार्थाच्या किमती आणि आकार देशभर एकसारखा असावा, याबद्दल कायदा करण्याची मागणी केली आहे हे विशेष!
- राज कुलकर्णी
एक देश एक निवडणूक ही भाजपाची घोषणा असून मोदी सरकारने राज्यातील कर कर रद्द करताना देशभर एका पदार्थाची वा वस्तूची एकच किंमत असावी म्हणून जीएसटी आणला, त्याच धर्तीवर समोसेही एकाच किमतीत व एकसारख्या आकारात मिळावेत ही रवि किशन यांची अपेक्षा मोदींच्या धोरणाबरहुकूमच म्हणावी लागेल. (Ravi Kishan)
रवि किशन हे भोजपुरी गायक नि अभिनेते आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटातील नि गाण्यातील प्रबोधन मूल्यांची चांगलीच जाण आहे. कांही वर्षांपूर्वी मोदींना आंबा खायला आवडतो, तो सुद्धा चोखून की कापून अशी मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमार याचा एक सिनेमा आला होता. त्यात एक गाणं होत, ‘जब तक रहेगा समोसेमें आलू, तेरा रहूंगा बनके मे शालू’ असे गाणे होते. तेव्हा समोसा आणि बटाटा यांचे अद्वैत आहे. शिवाय एकदा मोदीच म्हणाले होते की, आलू से सोना बनाने की फॅक्टरी बन सकती है’ पण मोदींचा हा शोध नंतर भाजपाच्या मीडिया सेल राहुल गांधींची बदनामी करण्यासाठी वापरला. बाकी काही असो पण समोस्यामध्ये बटाटा आहे आणि बटाट्यापासून सोने बनवता येते, म्हणजे समोस्याचे भाव नियंत्रण म्हणजे सोने समान दराने विक्रीचे काम आहे हे खरं! (Ravi Kishan)
भाजपा नेहमी समान नागरी कायदा आणायचे म्हणत असते, त्याची सुरूवात देशभर समोसा एकसमान दरात आणि आकारात विकला जाणार याचे सूत्रच रवि किशन यांनी संसदेत मांडले हे अभिनंदनीय नव्हे तर भारतामधे नरेंद्र मोदींचा काळ म्हणजे सुवर्णकाळ असल्याचेच प्रतिक नव्हे काय ?
समोसाबाबत महत्त्वाची माहिती अशी की, मुळात समोसा हा भारतीय नसून तो पर्शियन आहे. थोडक्यात सांगायचे तर आताचा ईराण म्हणजे पूर्वीचा पर्शिया. रवि किशन यांनी खरंतर समोसा या पदार्थाबद्दल भारतात कायदा करण्याचा मनोदय व्यक्त करून इस्रायल ईराण युद्धात इस्रायलला समर्थन देणाऱ्या भाजपा भक्तांना ईराणी पदार्थाचे महत्व सांगून आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीवर सर्जिकल स्ट्राईकच जणू केली आहे.
समोसा हे फारसी भाषेतील तळलेल्या त्रिकोणी पदार्थासाठी असलेल्या संबूसाग या नावांचे हिंदुस्थानी उर्दू नामांतर आहे. निमतनामा-इ-नसरूद्दीन शाहा या १५ व्या शतकातील ग्रंथात समोसा बनविण्याची विधी वर्णन केली आहे. मध्ययुगीन मध्य आशियातील ईस्लामी राज्यापैकी अल खलिफा अल अबासिया च्या काळातील कवि इसाक अल् मौसविली याने समोसावर काव्य लिहिले आहे. (Ravi Kishan)
भारतात समोसा पहिल्यांदा आला तो महमंद घोरीच्या खानसाम्यामार्फत. अमिर खुस्रो नि इब्न बतुता यांनी समोस्याबद्दल गौरवाने लिहिले असून महंमद बीन तुघलकच्या राजदरबारात समोसा सर्वांना आवडणारा आणि शाही दावतमध्ये महत्त्वाचा खाद्यपदार्थ होता म्हणे. आणि विशेष म्हणजे तुघलक काळात पुलावसोबत समोसा जेवणात वाढला जायचा. एकंदर पाहता दिल्लीच्या भूमीवर महंमद बीन तुघलकाच्या राजदराबरानंतर मोदींच्या राज्यकारकारभाराच्या काळातच शासकीय पातळीवर समोसा केंद्रस्थानी आलेला आहे. अर्थात मोदी आणि तुघलक यांची तुलना करण्याचा अजिबात हेतू नसून समोस्याचा इतिहास सांगणे हा शुद्ध हेतू आहे!
मुघल काळाचा इतिहास मोदी सरकार पुसण्यासाठी सदैव तत्पर असताना मुघल काळातील ‘ऐन-ए-अकबरी’ या ग्रंथात या व्यंजनाची माहिती असून सर्वसमान्य भारतीय लोक त्यास समोसा म्हणतात असेही म्हटले आहे.
पूर्वीचा पर्शिया, असो वा मध्यपूर्वेतील इतर देश यात लोकप्रिय असणारा समोसा भाज्या आणि मांस या मिश्रणाचा असल्यामुळे तो मांसाहारी होता पण आता भारतात मांसाहारी समोसा खूपच कमी असून शाकाहारी आणि तो बटाट्यापासून इतर भाज्यासह बनलेला असतो. पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यात समोसा मोठा असतो तर आंध्र, तेलंगाणा या राज्यात समोसा लहान आकाराचा असतो. म्हणून तर रवि किशन यांनी आकार सारखा असावा म्हणून मागणी केली आहे, यात त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
कांही वर्षांपूर्वी विरोधकांनी मोदी काळात देशात बेरोजगारी वाढली असा आरोप केल्यावर देशातील नेत्यांनी बेरोजगार युवकांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला होता. रवि किशन यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकार पकोड्यासोबत समोसासुद्धा तळण्यासाठी एखाद्या स्टार्ट अप उद्योगाची घोषणा करून त्यासाठी सबसिडीदेखील जाहीर करू शकते. देशातील बेरोजगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रवि किशन यांचा मुद्दा महत्वाचा ठरणार हे नक्की!
केंद्र सरकारने रवि किशन यांच्या मागणीप्रमाणे जरूर समोसाचा आकार नि दर यांसाठी कायदा करावा, फक्त मागणी एकच आहे की, अचानकपणे एखाद्या संध्याकाळी देशातील सर्व समोसे रद्द करू नये. कारण ते बदलून मिळण्याची घोषणा केली तरीही एका रात्रीत वा ठरविक अवधित समोसे बदलून घेण्यासाठी समोसा भक्तांच्या रांगा लागतील त्यात कोणाची जीवितहानी होऊ नये याची काळजी घ्यावी.
बाकी, रवि किशन यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांना देशाचे अन्न पुरवठा मंत्री म्हणून (महाराष्ट्रात फडणवीस यांनी कोकाटेंना विधान भवनात रमी खेळली म्हणून क्रीडा मंत्री केले या न्यायाने ) घोषित केले तर खूपच आनंदी आनंद असणार आहे..