कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल नगरपालिका निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांच्यात युती झाल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी एकत्र आल्याचा दावा केला. आपल्या युतीमागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा दावा केला. तसेच अदृश्य शक्तीचा हात असाच राहिला तर ही युती बराच काळ टिकेल असेही घाटगे यांनी सांगितले.
कागलच्या विकासासाठी एकत्र
मुश्रीफ आणि घाटगे यांच्या संयुक्त पत्रपरिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यावेळी बोलताना समरजीत घाटगे म्हणाले, आमच्या युतीमुळे कागल तालुक्यातील राजकारण बदलले आहे. २०११ ते २०१६ आमची आणि मुश्रीफ यांची युती होती. त्यावेळी आम्ही जो कारभार केला तो लोकांसमोर आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर कागलच्या विकासासाठी एकत्र आलो आहे. आमच्या दोघांमध्ये चांगला समन्वय आहे. आमच्या काही कार्यकर्त्यामध्ये मतभेद झाले ते आम्ही सोडवू. (Ghatge Mushrif’s claim of alliance for development)
संघर्ष मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न
वरिष्ठ पातळीवर संघर्ष मिटवण्याचे ठरले असल्याचे घाटगे यांनी सांगितले. मी आणि हसन मुश्रीफ यांनी काही पावले टाकली. आमची बैठक चांगली झाली. बैठकीच्यावेळी कोणासोबत बोलायला वेळ मिळाला नाही. विकासाचे मॉडेल घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. अदृश्य शक्तीचा हात असेल तर ही युती बरा काळ टिकले असेही ते म्हणाले.
संजय मंडलिक अस्वस्थ
माजी खासदार संजय मंडलिकांनी वापरा आणि फेकून द्या या टीकेवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, मुरगुड नगरपालिकेत मुश्रीफ मंडलिक गटाची युती होणे शक्य नव्हते. कागल नगरपालिकेत तसा त्यांचा जास्त संपर्क नाही. पण लोकसभा निवडणुकीत आम्ही दोघांनी मदत केली नाही असा आरोप केला आहे. पण परमेश्वर त्याचा साक्षीदार आहे. आम्ही दोघांनी काम केल्यामुळेच त्यांना कागलमध्ये मताधिक्य मिळाले. ते अस्वस्थ आहेत. पण आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले. (Ghatge Mushrif’s claim of alliance for development)
कागल तालुक्याला संघर्ष नवीन नाही
कागल तालुक्याला संघर्ष नवीन नाही. यापूर्वी सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यात संघर्ष झाला. माझा आणि संजयबाबा घाटगे यांचा संघर्ष झाला पण आम्ही एकत्र आलो. आता मी आणि समरजीत घाटगे एकत्र आलो आहोत. राजकारणात संघर्ष हा कायम नसावा. विकासासाठी एकत्र आलो पाहिजे याच भावनेने आम्ही एकत्र आलो आहोत, असे मश्रीफांनी स्पष्ट केले. (Ghatge Mushrif’s claim of alliance for development)