पॅरिस : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. याबरोबरच, त्याने या स्पर्धेतील विजयांचे शतकही साजरे केले. एकाच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत शतकी विजय मिळवून जोकोविच हा रॉजर फेडरर, रफाएल नदाल यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. (Djokovic)
सहाव्या मानांकित जोकोविचने नोरीविरुद्धचा सामना ६-२, ६-३, ६-२ असा जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत जर्मनीचा तृतीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. जोकोविचने विक्रमी १९ व्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याबरोबरच, सर्वाधिकवेळा एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याचा फेडररच्या विक्रमालाही जोकोविचने मागे टाकले. फेडररने कारकिर्दीत १८ वेळा विम्बल्डन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. (Djokovic)
फ्रेंच ओपनमध्ये सर्वाधिक ११२ विजयांचा विक्रम नदालच्या नावे आहे. फेडररने विम्बल्डन (१०५) आणि ऑस्ट्रेलियन ओपन (१०२) अशा दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विजयांचे शतक पार केले आहे. जोकोविचला प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत १०० विजय नोंदवता आले. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आतापर्यंत ९९ विजय मिळवले असून विम्बल्डनमध्ये त्याच्या नावावर ९७ विजय आहेत. जोकोविचने विक्रमी २४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्यांमध्ये तीन फ्रेंच ओपन विजेतेपदांचाही समावेश आहे. (Djokovic)
हेही वाचा :
सिंधू, सात्विक-चिराग यांची विजयी सलामी
गुकेशचा कार्लसनवर सनसनाटी विजय