कोलंबो : यजमान श्रीलंकेच्या महिला संघाने तिरंगी वन-डे क्रिकेट मालिकेमध्ये भारतावर ३ विकेटनी विजय नोंदवला. भारताच्या ९ बाद २७५ धावांना प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने ४९.१ षटकांत ७ बाद २७८ धावा केल्या. श्रीलंकेला तब्बल सात वर्षांनंतर भारताला वन-डे क्रिकेटमध्ये हरवण्यात यश आले असून दोन्ही देशांमधील ३४ सामन्यांमध्ये श्रीलंकेचा हा तिसरा विजय आहे. भारताला मात्र या मालिकेत अगोदरच्या सलग दोन विजयांनंतर प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. (Srilanka Win)
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षिका सिल्वा यांनी अर्धशतके झळकावली. हर्षिताने ६१ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ५३ धावा केल्या, तर निलाक्षिकाने ३३ चेंडूंमध्ये ५ चौकार, ३ षटकारांसह ५६ धावा फटकावल्या. निलाक्षिका ४३ व्या षटकात बाद झाली, तेव्हा श्रीलंकेच्या ७ बाद २३८ धावा झाल्या होत्या. त्यांना विजयासाठी ४४ चेंडूंत ३८ धावांची गरज होती. मात्र, अनुष्का संजीवनी आणि सुगंदिका कुमारी यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ४० धावांची भागीदारी रचत श्रीलंकेचा विजय साकारला. भारताची वेगवान गोलंदाज काशवी गौतम ५ षटके गोलंदाजी केल्यानंतर दुखापतग्रस्त झाल्यामुळे पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचा फटका अखेरच्या षटकांमध्ये भारतीय संघास बसला. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. (Srilanka Win)
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रिचा घोषने अर्धशतकी खेळी करताना ४८ चेंडूंमध्ये, ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. प्रतिका रावल (३५), जेमिमा रॉड्रिग्ज (३७), कर्णधार हरमनप्रीत कौर (३०) या चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात कमी पडल्या. श्रीलंकेकडून सुगंदिका कुमारी आणि चमारी अटापट्टू यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. भारताचा या मालिकेतील अखेरचा साखळी सामना ७ मे रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. (Srilanka Win)
संक्षिप्त धावफलक : भारत – ५० षटकांत ९ बाद २७५ (रिचा घोष ५८, जेमिमा रॉड्रिग्ज ३७, प्रतिका रावल ३५, सुगंदिका कुमारी ३-४४, चमारी अटापट्टू ३-४३) पराभूत विरुद्ध श्रीलंका – ४९.१ षटकांत ७ बाद २७८ (हर्षिता रमरविक्रमा ५३, निलाक्षिका सिल्वा ५६, कविशा दिलहारी ३५, स्नेह राणा ३-४५, प्रतिका रावल १-३२).