जमीर काझी :मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच निवडणुकीला युतीने सामोरे जात असून युतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल. कोणीही नाराज होऊ नये, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेबरोबर युती जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा रंगशारदा सभागृहात घेतलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊ नये, भविष्यात आणखी संधी दिल्या जातील, अशा शब्दात नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली. (Raj Thackeray’s order to uphold the alliance dharma)
मेळावा झाल्यानंतर त्याबाबत माहिती देताना मनसे नेते बाळा नांदगावकर त्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “ही निवडणूक मराठी माणसाच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळं जोमानं कामाला लागा आणि निवडणुकीला सामोरे जा, असा संदेश राज ठाकरे यांनी सर्वांना दिला. युतीत असताना, काही सीट येतात काही सोडाव्या लागतात. काहींना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यामुळे कुणीही निराश होऊ नका, रागावू नका. पक्षाच्या २० वर्षांच्या इतिहासात आपण पहिल्यांदाच युतीमध्ये लढतोय. त्यामुळं युतीचा धर्म पाळावाच लागेल. प्रत्येक जागा ही मुंबईसह महाराष्ट्रासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसासाठी महत्वाची आहे. तसेच रात्र वैऱ्याची असल्यानं सर्वांनी सावध राहा, सर्वस्व झोकून देत आपल्याला मुंबई वाचवायची आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. (Raj Thackeray’s order to uphold the alliance dharma)
“ही निवडणूक मुंबईतील मराठी माणसाच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळं जोमानं निवडणुकीला सामोरे जा. असा संदेश राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना दिला. सर्वांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी एक व्हायला हवे, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव सुरू आहे. मात्र मुंबई आपल्याच हातात राहायला हवी, ती आपल्यापासून वेगळी करण्याचे स्वप्न उध्वस्त करा. आपापसातील भांडणापेक्षा आणि निवडणूक महत्त्वाची आहे. मुंबई कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातून जाता कामा नये. तुमच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ज्या ठिकाणी फॉर्म भरतील तिथं तुम्हीही सहभागी व्हा. शरद पवारांची राष्ट्रवादीही आपल्या सोबत आहे. त्यांच्यासोबत पण उमेदवारी अर्ज दाखल करायला जा, त्यांच्याही प्रचारात सहभाग व्हा. आपण निस्वार्थपणे पाठिंबा काही पक्षांना दिलेला आहे. प्रत्येक जागा ही मुंबईसह महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी महत्वाची आहे. पहिल्यांदाच युतीमध्ये निवडणूक लढवतोय आपल्याला याचा अनुभव नाही, काही सीट इकडे तिकडे जातात, पण तुम्ही अजूनही तरुण आहात अशा अनेक संधी पुढे उपलब्ध होतील. असा संदेश या मेळाव्यातून राज ठाकरेंनी दिल्याचे नांदगाकर यांनी सांगितले. (Raj Thackeray’s order to uphold the alliance dharma)