जमीर काझी : मुंबई : कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा गैरफायदा घेऊन भाजपाने राम मंदिराच्या निधीवर दरोडा टाकला आहे.असा आरोप करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप विरुद्ध थेट रणशिंग फुंकले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी आणि देणगी निधीच्या कोट्यावधीच्या अपहाराच्या विरोधात ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली. येत्या रविवारी ( दि.५) दादर येथे हनुमान मंदिराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभर खेड्या पाड्यात शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. (Uddhav Thackeray announces the ‘Ramraksha’ agitation)
ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का?
पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर अत्यंत आक्रमक शब्दांत जोरदार हल्लाबोल करून उद्धव म्हणाले,”आज देशामध्ये भाजपच्या काळात राम मंदिराचा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे. राजकीय पक्ष तोडले जात आहेत, आमदार गोव्यात किंवा इतरत्र पळवले जात आहेत, खरेदी-विक्री होते आहे आणि याला ‘ऑपरेशन‘ नाव दिले जाते. मग आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला असं वाटतं की, या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील, नसतील, बातम्या छापून येत असतील नसतील, पण राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जात आहे, त्याचे पुरावे सुद्धा दिले गेले आहेत.
अब हिंदू माफ नहीं करेगा
काही जणांचे म्हणणे आहे की चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे ,हे फार गंभीर आहे,” असा आरोप करून उद्धव ठाकरे म्हणाले की, “जसे एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की ‘अब हिंदू मार नही खायेगा’, तसे मी म्हणतोय की, मंदिर लुटारूंना ‘अब हिंदू माफ नहीं करेगा’. मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. पाच तारखेला दादर येथे हनुमान मंदिरासमोर तमाम हिंदूंना मी आमंत्रित करत आहे. पक्ष वगैरे न बघता, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, त्यांनी एकत्र यावे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही, तर ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेले नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सगळे हिंदू यात येऊ शकतील, त्यांनी यावे. तिथे मग आम्ही ‘रामरक्षा’ आंदोलन करतो आहोत. आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू. येथून हा जाहीर कार्यक्रम सुरू होईल,” अशी घोषणा त्यांनी केली आहे. (Uddhav Thackeray announces the ‘Ramraksha’ agitation)
खेड्यापाड्यात रामभक्त एकत्र येतील
“यानंतर प्रत्येक ठिकाणी राज्यभर, जिल्ह्यामध्ये, शहरांमध्ये आणि अगदी खेड्यापाड्यात सुद्धा जिथे जिथे राम मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, तिथे हे सर्व हिंदू, सर्व रामभक्त एकत्र येतील. मी तर म्हणेल आता वारीची सुरुवात होते आहे, अगदी वारकरी सुद्धा या राम मंदिराच्या लुटीविरोधात ज्यांच्या मनात आग आहे, ज्यांच्या मनात राग आहे, ते सगळे एकत्र होऊन या भारतीय जनता पक्षाला याचे उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाहीत,” असेही त्यांनी सांगितले. (Uddhav Thackeray announces the ‘Ramraksha’ agitation)