नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) विद्यमान उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे संघटनेचे प्रभारी अध्यक्ष होणार आहेत. बीसीसीआयचे विद्यमान अद्यक्ष रॉजर बिनी हे जुलै महिन्यात वयाची ७० वर्षे पूर्ण करत असल्याने त्यांची जागा शुक्ला घेतील. (Rajiv Shukla)
बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार अध्यक्षपदावरील व्यक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षांची आहे. बीसीसीआयची नवी कार्यकारिणी यावर्षी सप्टेंबर महिन्यात निवडण्यात येईल. तत्पूर्वी, बिनी वयाची ७० वर्षे पूर्ण करत असल्याने त्यानंतरच्या तीन महिन्यांसाठी शुक्ला प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हे अध्यक्षांचा कार्यभार सांभाळतील, अशी तरतूद बीसीसीआयच्या घटनेमध्ये आहे. मागील वर्षी तत्कालीन बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळेही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी, तत्कालीन सहसचिव देवाजित सैकिया यांनी प्रभारी सचिव म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर, सैकिया यांची नियमित सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Rajiv Shukla)
सध्या काँग्रेसतर्फे राज्यसभा खासदार असणारे ६५ वर्षीय शुक्ला हे २०२० मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. २०२२ मध्ये त्यांची याच पदावर बिनविरोध फेरनिवड झाली होती. तत्पूर्वी, शुक्ला यांनी २०११ ते २०१७ आयपीएल प्रमुखपदाचीही जबाबदारी सांभाळली होती. (Rajiv Shukla)
हेही वाचा :
भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू
मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना करा