कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजपला रोखण्यासाठी सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. या गटाला काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांची साथ मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीला तडा बसला आहे. (Chandgad Nagar Panchayat)
चंदगड विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात एकत्र आले आहेत.आमदार शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार तत्कालिन आमदार राजेश पाटील यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीनंतर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. चंदगड विधानसभा मतदार संघात भाजप आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. काँग्रेसचे अप्पी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजप आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदाताई बाभूळकर आणि माजी आमदार राजेश पाटील एकत्र आले आहेत. दोघांनीही विधानसभा निवडणूक लढवली होती. पण दोघांचा पराभव झाला आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील निवडून आले होते. (Chandgad Nagar Panchayat)
आज सोमवारी मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली असून चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी या नावाने निवडणूक लढवणार आहेत. यावेळी बोलताना राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांनी पुरोगामी विचारामुळे आम्ही एकत्र आलो आहेत असे स्पष्ट केले. दोन्ही गट एकत्र आल्याने ताकद वाढली अन काँग्रेस पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते आघाडीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही गट एकत्र आल्याबद्दल मुश्रीफांनी समाधान व्यक्त केले. (Chandgad Nagar Panchayat)