नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) संगनमताने मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पुन्हा एकदा केला. (Rahul again targets EC)
राहुल यांनी पुराव्यानिशी ‘मत चोरी’ उघड करत निवडणूक आयोग संगनमताने मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात कसा फसवणुकीत सहभागी आहे, याची पोलखोल केली.
‘मत चोरी’चे राहुल गांधी यांनी दिलेले पुरावे…
- एकच व्यक्ती अनेक ठिकाणी मतदान करते. अशा हजारो व्यक्ती आहे ज्यांनी असे मतदान केल्याचे दिसते. दुसरी व्यक्ती कर्नाटकातील मतदारसंघात मतदान करते, तीच उत्तर प्रदेशच्या लखनौ, वाराणसीमध्ये मतदान करते…आदित्य श्रीवास्तव अनेक मतदान केंद्रांवर मतदान करते, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध मतदान केंद्रांवर मतदान करते…विशाल सिंग ही व्यक्ती दोनवेळा कर्नाटकात आणि एकदा वाराणसीत मतदान करते.
११ हजार अशा व्यक्ती आहेत ज्यांनी तीन ते चार वेळा मतदान केल्याचे दिसते.
- ओपीनियन पोल एक सांगत होते आणि निकाल मात्र वेगळेच लागत होते…
- फेक नॅरेटिव्ह, कॅम्पेन चालवले जात होते, त्याला निवडणूक आयोग साथ देत होता.
- महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांत जेवढे मतदार वाढले नव्हते तेवढे वाढवण्यात आले…
- लोकसभेत आमची आघाडी जिंकतो आणि विधानसभेत आमचे पानिपत होतेय, हे असे का होतंय हे लक्षात घेऊन आम्ही शोध घेऊ लागलो…
- अनेकवेळा आम्ही निवडणूक आयोगाकडे पुरावे मागितले, ते दिले नाहीत.
- सीसीटीव्ही फुटेजही काढून टाकण्यात आले… कर्नाटकात शोध सुरू केला, त्यात काय आढळले?…तर बोगस मतदार, दुबार मतदार, एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे, चुकीचा फोटो, फॉर्म ६चा दुरूपयोग, अशा पद्धतीने ही मतचोरी करण्यात आली.
२०२४ मध्ये सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधानांना फक्त २५ जागा ‘चोरण्याची’ गरज होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने ३३,००० पेक्षा कमी मतांनी २५ जागा जिंकल्या, असा आरोप श्री. गांधी यांनी केला. (Rahul again targets EC)
२०२३ च्या छत्तीसगड निवडणुकीपासून काँग्रेसला संभाव्य निवडणूक घोटाळ्याबद्दल शंका होती, असा दावा करून श्री. गांधी म्हणाले की २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते स्पष्ट झाले. या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या युतीचा भाजपकडून पराभव झाला.
श्री. गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने केलेल्या चौकशीत असे आढळून आले की एकट्या कर्नाटकच्या महादेवपुरा येथे एक लाखाहून अधिक बनावट आणि अवैध मते आढळली. २०२३ मध्ये महादेवपुरा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा भाजपकडून पराभव झाला.
‘‘मी एक राजकारणी आहे आणि मी लोकांशी बोलत आहे. मी हे शपथपूर्वक सांगतोय,’’ असे सांगून गांधी म्हणाले, ‘‘राहुल गांधी चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटलेले नाही.’’ (Rahul again targets EC)
पुरावे सादर करा : निवडणूक आयोग
श्री गांधी यांनी विविध राज्यांमध्ये मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केल्यानंतर, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) त्यांना त्यांनी केलेल्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. कर्नाटकात एक लाखावर मतांची चोरी झाली.
कर्नाटक मुख्य निवडणूक कार्यालयाने श्री गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादीत फेरफार केल्याच्या दाव्यांचे पुरावे ८ ऑगस्टअखेर सादर करण्यास सांगितले आहे.