नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञानासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. ‘‘या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या भारत भेटीची उत्सुकता आहे, ’’ असे ते म्हणाले. (JD Vance Visit)
अधिकृत निवेदनानुसार, डोनाल्ड ट्रम्प या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देणार आहेत. भेटीची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शुल्कामुळे सुरू झालेल्या जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. तथापि, त्यांनी अमेरिकेच्या व्यापारी सहभागी देशांना अमेरिकेशी करार करण्यास परवानगी देण्यासाठी या शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. (JD Vance Visit)
ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या ९० दिवसांच्या कर सवलती दरम्यान सवलती मिळवण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याने ही भेट झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतीय वस्तूंवर २६% कर लादण्याचे जाहीर केले होते. दोन महिन्यांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात भेट झाली. त्यानंतर व्हान्स चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी व्हान्स यांच्या पत्नी उषा आणि त्यांच्या तीन मुलांशीही संवाद साधला.
पंतप्रधान मोदी आणि जेडी व्हान्स यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेतला. परस्पर फायदेशीर भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींचे स्वागत केले. (JD Vance Visit)
‘‘पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व्हान्स यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांमधील प्रगतीचा आढावा घेतला. सकारात्मक मूल्यांकन केले. दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तसेच परस्पर फायदेशीर भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले,’’ असे यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे.
ऊर्जा, संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांची नोंद केली, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. पुढे जाण्याचा मार्ग म्हणून संवाद आणि राजनयिकतेची गरज अधोरेखित केली.
हेही वाचा :
नव्या पोप यांच्या निवडीत चार भारतीयांचा सहभाग
ईडी मोदी-शाह यांची वसुली गँग