मुंबई : भाजपाचे नागपूरमधील नेते व विधान परिषदेतील सदस्य परिणय फुके यांच्याकडून होत असलेल्या छळाविरोधात त्यांच्या विधवा भावजय प्रिया फुके यांनी सोमवारी (७ जुलै) आपल्या दोन लहान मुलांसमवेत निदर्शने केली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोरच त्यांनी निदर्शने केली. (protests against Phuke)
मुख्यमंत्र्यांनी आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी करत ते निषेधाचा फलक बाहेर काढत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये घातले. त्यामुळे त्यांचे आंदोलन अवघ्या काही मिनिटांत संपुष्टात आले.
परिणय फुके आणि त्यांच्या दिवंगत लहान भावाच्या पत्नी प्रिया फुके यांच्यात कौटुंबिक आणि मालमत्तेच्या कारणावरून वाद आहे. फुके हे राजकीय दबाव आणत असल्याने पोलीस कारवाई करत नाहीत, तसेच विविध माध्यमातून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (protests against Phuke)
याबाबत देवेंद्र फडणवीस यांची गेल्या एक वर्षांपासून भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ते भेट देत नाहीत, त्यामुळे राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने प्रिया यांनी सोमवारी आपल्या दोन लहान मुलांसमवेत विधानभवनासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी जादा बंदोबस्त लावून कोणतेही निदर्शने होऊ द्यायची नाहीत, याची तयारी केली होती. (protests against Phuke)
दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रिया फुके एका खासगी वाहनातून विधान भवनासमोर उतरल्या. त्यांच्यासमवेत त्यांचा लहान मुलगा, मुलगी आणि आणखी एक महिला होती. आपल्या पर्समधून एक फलक काढून घोषणा देत होत्या. त्यावेळी एका महिला पोलिसाने तो काढून घेत त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या पावित्र्यामुळे मुले घाबरून एका बाजूला झाली. त्या सर्वांना व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी प्रिया यांनी आपल्यावर अन्याय होत असून मुख्यमंत्रीही भेटत नाहीत, परिणय फुके यांच्यावर कारवाई करावी, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली.