कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणक्षेत्रात पाऊस बरसत असून अतिवृष्टी झाली आहे. गेल्या आठ तासात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर पडले असून जिल्ह्यातील ३७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ३१फूट ३ इंच इतकी आहे. (Heavy rain in dam area)
गेले तीन दिवसात जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणक्षेत्रात ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरणक्षेत्रात १०२, आजरा तालुक्यातील सर्फनाला १९०, राधानगरीत ९३, तुळशीत ९७, दूधगंगा ७१, चित्री धरणक्षेत्रात ६५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (Heavy rain in dam area)
सोमवारी जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली होते. आज त्यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ३७ बंधारे पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरणक्षेत्रातील अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीचे पाणी यंदा प्रथमच पात्राबाहेर गेले आहे. नदीवर सर्व घाट पाण्याखाली गेले असून पाणी घाटाजवळील रस्त्यांवर आले आहे. राधानगरी धरण ६४.१३ टक्के भरले असून तुळशी धरण ५६ टक्के, वारणा धरण ६०.३९ तर दूधगंगा धरण ३७.४७ टक्के भरले आहे. (Heavy rain in dam area)