चँगवॉन : भारताची पॅरालिंपिक पदकविजेती दिव्यांग नेमबाज मोना अगरवालने डब्ल्यूएसपीएस वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. राजस्थानच्या मोनाने आर-२ १० मी. एअर रायफल स्टँडिंग एसएच-१ प्रकारात हे पदक जिंकले. (Mona Agarwal)
दक्षिण कोरियातील चँगवॉन येथे ही स्पर्धा सुरू आहे. मोनाने मागील वर्षी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. त्यानंतर, तिने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदकविजेती कामगिरी केली. वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीत तिने ६२०.६ गुणांसह दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. कोरियाची यूजेआँग ली ६२१.९ गुणांसह प्राथमिक फेरीत अव्वलस्थानी, तर कोरियाचीच युन्री ली ६२० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. अंतिम फेरीत मात्र युन्रीने इतर नेमबाजांपेक्षा सरस कामगिरी करत २४९ गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्याखालोखाल मोनाने २४६.६ गुण मिळवून रौप्यपदक निश्चित केले. कोरियाचीच मियाँग किम ही २२५.९ गुणांसह ब्राँझपदकाची मानकरी ठरली. (Mona Agarwal)
पॅरिस पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या अवनी लेखराचे पदक मात्र अवघ्या ०.१ गुणाने हुकले. अवनीने प्राथमिक फेरीत ६१७.५ गुण पटकावून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत सातव्या राउंडअखेर तिच्या खात्यात २०४.८ गुण होते. किमपेक्षा तिचे केवळ ०.१ गुण कमी असल्यामुळे अवनी पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकली गेली. प्राथमिक फेरीत अग्रस्थानी राहिलेल्या यूजेआँगला १८३.८ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (Mona Agarwal)
दरम्यान, या स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी रविवारी भिन्न प्रकारांत आणखी दोन ब्राँझपदकेही जिंकली. आर-१० मिश्र सांघिक १० मी. एअर रायफल स्टँडिंग एसएच-१ प्रकारांत अवनी लाखेरा-इशांत अहुजा ही भारतीय जोडी ब्राँझपदकाची मानकरी ठरली. ब्राँझपदकाच्या लढतीत त्यांनी भारताच्याच मोना अगरवाल-स्वरूप उन्हाळकर या जोडीचा १६-१२ असा पराभव केला. त्याचबरोबर, पी-६ मिश्र सांघिक १० मी. एअर पिस्टल एसएच-१ प्रकारातही भारताच्या सुमेधा पाठक-रुद्रांश खंडेलवाल या जोडीने ब्राँझपदक जिंकले. त्यांनी कोरियाच्या म्युंगसून पार्क-जंगनाम किम यांचा १६-१० असा पराभव करून पदक निश्चित केले.