कोल्हापूर : प्रतिनिधी : धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस, धरणातून होणारा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ३६.३ फुटांवर पोचली असून इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फुटापर्यंत आहे. कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीकाठावर महापुराची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्गाचा वेग वाढवला असल्याने महापुराचा फटका बसू नये यासाठी महाराष्ट आणि कर्नाटक राज्याकडून समन्वय साधला जात आहे.
जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. कुंभी धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात सर्वात जास्त ३०५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणक्षेत्रात २२१, तुळशी धरण क्षेत्रात २२६, चांदोलीत ९२, दुधगंगा धरणक्षेत्रात १९९, कासारीत २५१, कडवीत १५९, पाटगांव धरणक्षेत्रात १६५, चिकोत्रात १०५, चित्रीत ४७, घटप्रभात २०८, जांबरेत १३७, आंबे ओहोळमध्ये ८१, सर्फनालात १११, धामणीत १६५ तर कोदे धरणक्षेत्रात २५६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आल्याने नद्यांना पूर आला आहे. (Panchganga river nears warning level)
नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली आले असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. आंबा आणि करुळ घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर सिंधुदुर्ग वाहतूक बंद झाली आहे. त्यातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
कोल्हापूर – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दस्तुरी चौक, कळे येथे बॅरिकेट लावून गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवण्यात येत आहेत. तसेच कोल्हापूर – राजापूर हा राज्य मार्ग सुद्धा बाजारभोगाव या ठिकाणी पाणी आल्यामुळे बंद झाला आहे.
अणुस्कुरा घाटात दरड कोसळली.

दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करणेकरिता आज सकाळी धरण सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरु असणाऱ्या १४ हजार घनफूट प्रतिसेकंद विसर्ग मध्ये वाढ करून एकूण १८ हजार ५०० घनफूट प्रतिसेकंद विसर्ग सोडणेत येणार आहे. विद्युत निर्मिती केंद्रातून सुरु असणारा १५०० घनफूट प्रतिसेकंद व सांडव्यावरून सोडणेत येणारा १८ हजार ५०० घनफूट प्रतिसेकंद असा एकूण २० हजार घनफूट प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रमध्ये असणार आहे. नदीपात्रामधील पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कचे आवाहन करण्यात आले आहे.
कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कुंभी धरणातून १३०० क्युसेक पाणी सोडले होते. त्यामध्ये दुप्पट वाढ झाली असून २६०० क्युसेक पाणी सोडले आहे. राधानगरी धरणातून ११ हजार ५०० क्युसेक पाणी स्वयंचलित सात दरवाजातून वाहत आहे. कासारी धरणातून १५०० क्युसेक तर धामणी धरणातून १० हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Panchganga river nears warning level)