नवी दिल्ली : यावर्षी भारत व श्रीलंकेत रंगणाऱ्या महिला वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे सोमवारी जाहीर झाले. भारत व पाकिस्तानकडे यजमानपद असणाऱ्या आयसीसी स्पर्धांमधील परस्पर देशाचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार पाकिस्तानचे सामने कोलंबोमध्ये होणार असून येथेच ५ ऑक्टोबर रोजी भारत-पाक सामना रंगेल. (Women’s World Cup)
या वर्ल्ड कपमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबरदरम्यान एकूण ३१ सामने खेळवण्यात येतील. साखळी फेरी राउंड रॉबिन पद्धतीने होणार असून सर्व संघांचे सामने सर्व संघांशी होतील. ३० सप्टेंबर रोजी बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर स्पर्धेचा सलामीचा सामना यजमान भारत आणि श्रीलंकेदरम्यान होईल. २ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्येच स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल. तथापि, पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास हा सामना कोलंबोमध्ये खेळवण्यात येईल. बेंगळुरू व कोलंबोव्यतिरिक्त इंदूर, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम या ठिकाणी स्पर्धेतील सामने रंगतील. (Women’s World Cup)
भारत चौथ्यांदा महिला वन-डे वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी, १९७८, १९९७ आणि २०१३ साली भारतात महिला वन-डे वर्ल्ड कप रंगला होता. भारताला अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. २००५ आणि २०१७ या दोन वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु, दोन्ही वेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. (Women’s World Cup)
भारतीय संघाचे वर्ल्ड कपमधील सामने
३० सप्टेंबर – भारत वि. श्रीलंका, बेंगळुरू
५ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, कोलंबो
९ ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम
१२ ऑक्टोबर – भारत वि. ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम
१९ ऑक्टोबर – भारत वि. इंग्लंड, इंदूर
२३ ऑक्टोबर – भारत वि. न्यूझीलंड, गुवाहाटी
२६ ऑक्टोबर – भारत वि. बांगलादेश, बेंगळुरू
हेही वाचा :
गंभीर इंग्लंडला परतणार
आर्या-अर्जुन यांना मिश्रमध्ये सुवर्ण