इस्लामाबाद : वृत्तसंस्था : अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांदरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादविरोधी आणि सुरक्षा मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. चीनच्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि सर्वोच्च लष्करी अधिकारी जनरल झांग युक्सिया यांनी त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह पाकिस्तानला भेट दिली. जनरल झांग यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेतली. या आमने-सामने बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.
डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, चीनने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याची मागणी केली. पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या चीनी नागरिकांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना आणखी मजबूत कराव्यात, असा चीनचा आग्रह आहे. तथापि, पाकिस्तानने स्पष्ट केले, की दोन्ही देशांमधील दहशतवादविरोधी सहकार्य “परस्पर सार्वभौमत्व आणि आदर” या तत्त्वांवर आधारित असेल. भारताची प्रादेशिक भूमिका आणि अफगाणिस्तानातील परिस्थिती, विशेषत: दहशतवादी गटांच्या कारवाया यावर बैठकीत सखोल चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी प्रादेशिक स्थैर्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मान्य केले.