लॉसन : आगामी लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या क्रिकेट क्रीडाप्रकारात पुरुष व महिला गटांमध्ये प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील. या ऑलिंपिकमध्ये समाविष्ट क्रीडाप्रकारांची यादी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) गुरुवारी जाहीर केली. (Olympics Cricket)
ऑलिंपिकमध्ये तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. यापूर्वी, १९०० साली पॅरिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा सामना रंगला होता. त्यावेळी, केवळ ब्रिटन आणि फ्रान्स या दोनच संघांमध्ये दोनदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. लॉस एंजेलिसमध्ये टी-२० क्रिकेटचे सामने होतील. पुरुष व महिला गटातून प्रत्येकी सहा संघांना ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळेल. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) बारा पूर्णवेळ सदस्य असून ९४ संलग्न सदस्य आहेत. ऑलिंपिकसाठी क्रिकेट संघांची पात्रता कशी असेल, हे अद्याप निश्चित नसले, तरी यजमान संघ म्हणून अमेरिका संघाला थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे, अन्य पाच जागांसाठी संघांमध्ये चुरस असेल. ऑलिंपिक प्रवेशाच्या अंतिम मुदतीवेळी आयसीसी क्रमवारीत आघाडीवर असणारे पाच संघांनाच ऑलिंपिकमध्ये थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. (Olympics Cricket)
क्रिकेटप्रमाणेच बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस (सिक्सेस) आणि स्क्वॉश हे नवे खेळ लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. गुरुवारी झालेल्या आयओसीच्या बैठकीत २०२४ पॅरिस ऑलिंपिकपेक्षा विविध क्रीडाप्रकारांमध्ये २२ अधिक सुवर्णपदकांसाठी स्पर्धा खेळवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये एकूण ३५१ सुवर्णपदकांच्या स्पर्धांचा समावेश असेल. या ऑलिंपिकमध्ये खेळाडूंचा एकूण कोटा १०,५०० इतका असेल. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या खेळांसाठी ६९८ खेळाडूंचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच पुरुष व महिला गटासाठी समान कोटा ठेवण्यात येणार आहे. (Olympics Cricket)
कम्पाउंड तिरंदाजीही समाविष्ट
लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये प्रथमच तिरंदाजीतील कम्पाउंड प्रकाराचा समावेश करण्यात येणार आहे. १९७२ च्या म्युनिच ऑलिंपिकमध्ये तिरंदाजीचा समावेश झाल्यापासून हा खेळ केवळ रिकर्व्ह प्रकारात खेळवण्यात येत होता. आगामी ऑलिंपिकमध्ये मिश्र सांघिक गटामध्ये कंपाउंड तिरंदाजी स्पर्धा खेळवली जाईल. परिणामी, तिरंदाजीतील पदकांची संख्याही पाचवरून सहा झाली आहे. त्याचबरोबर, ऑलिंपिकमधील बॉक्सिंग खेळासाठी पुरुष गटाप्रमाणेच महिला गटामध्येही सात वजनी गट असतील, असे आयओसीने या बैठकीत निश्चित केले.
हेही वाचा :
विराट कोहली १३,००० पार