मुंबई : प्रतिनिधी : मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निकेत कौशिक यांची नवे पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांची बदली अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मुंबई येथे करण्यात आली आहे. काल मंगळवारी मीरा भाईंदर येथे मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी परवानगी दिली नव्हती. मराठी भाषिकांचा मोर्चा त्यांनी व्यवस्थित न हाताळल्याने त्यांच्यावर तडकाफडकी बदलीची कुऱ्हाड कोसळली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन पोलिस आयुक्त कौशिक अतिशय कार्यक्षम असून त्यांना आठ भाषा येतात अशी माहिती पुढे आली आहे. (Kaushik)
मीरा भाईंदर येथे मंगळवारी निघालेल्या मराठी मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पहाटे ताब्यात घेतले होते. मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठी भाषिक महिला आणि कार्यकत्यांनी बळाचा वापर करुन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. विधीमंडळात त्याचे पडसाद उमटले. गुजरातील भाषिकांना मोर्चास परवानगी देता मग महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का दिली जात नाही असा खडा सवाल मोर्चेकऱ्यांकडून केला होता. त्यामुळे मुंबई, ठाण्यातून मोठ्या प्रमाणात मराठी माणूस मीरा भाईंदरकडे निघाला. त्यानतंर दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मोर्चाला परवानगी देण्यात आली. हजारोंच्या संख्यने मीरा रोड स्टेशनकडे मोर्चा निघाला. मात्र मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पोलिसबळाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न झाला असे मनसेकडून सांगितले जाऊ लागले. मोर्चा रोखण्यात राज्य सरकारचा हात असल्याचा आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली. (Kaushik)
मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले होते की, पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती. मनसे नेते जाणीवपूर्वक मोर्चासाठी असा मार्ग मागत होते ज्यामुळे संघर्ष निर्माण होईल. पोलिसांनी दिलेला मार्ग मनसे नेत्यांनी नाकारला होता. असे मला पोलीस आयुक्तांनी सांगितले, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र मनसे नेत्यांना पर्यायी मार्गाचा पर्यायच देण्यात आला नसल्याचे माजी आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल केली का, असा सवाल उपस्थित झाला.
मनसेच्या मोर्चानंतर दुसऱ्याच दिवशी मधुकर पांडेंची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) पदी बदली करण्यात आली आहे. नवे आयुक्त म्हणून निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचारविरोधी कारवायांसाठी निकेत कौशिक ओळखले जातात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक पदावर ते याआधी कार्यरत होते. त्यांना आठ भाषा अवगत आहेत. आठही भाषा त्यांना समजतात आणि ते सहज बोलूही शकतात. एटीएसमध्ये असताना त्यांनी विविध भाषांवर प्रभुत्व मिळवले असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. (Kaushik)