शिलाँग/इंदूर : हनिमूनवर गेलेल्या जोडप्यांपैकी पतीचा मृतदेश शिलाँग येथील दरीत सापडला. तर विवाहिता बेपत्ता आहे. राजा रघुवंशी (रा. इंदूर) असे मृताचे नाव आहे. त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी वेइसावॉन्ग फॉल्सच्या दरीत सापडला. २३ मे रोजी पत्नी सोनम आणि तो बेपत्ता झाले होते, असे पोलिसांनी सांगितले. (Tragedy with newly wed couple)
दरम्यान, या जोडप्याच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची तसेच सोनमचा शोध लष्कराच्या मदतीने घेण्याची मागणी केली.
‘‘ही हत्या होती यात शंका नाही. आम्हाला एक दुवा सापडला आहे,’’ असे पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सायम म्हणाले, गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. पीडितेचा मोबाईल देखील सापडल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राजाचा मृत्यू दरीत पडण्यापूर्वी झाला की नंतर झाला हे निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहे. ‘‘आम्ही सर्व शक्यतांच्या अंगांनी शोध घेत आहोत. यामागचा हेतू दरोडा, सूड किंवा आरोपी आणि पीडितांमधील कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा वाद होता का, आम्हाला ते शोधून काढावे लागेल. निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्हाला अधिक पुरावे शोधावे लागतील,’’ असे एसपी पुढे म्हणाले. (Tragedy with newly wed couple)
त्यांनी सांगितले की, चौकशीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. ‘‘उद्या, आम्ही लगतच्या परिसरात पत्नीचा शोध पुन्हा सुरू करू कारण दरी बरीच लांब पसरली आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले. राजाच्या मृतदेहाजवळ एका महिलेचा पांढरा शर्ट, मोबाईलची तुटलेली स्क्रीन आणि औषधांची चिठ्ठी सापडली आहे.
त्याचे स्मार्टवॉच अजूनही त्याच्या मनगटावर होते, परंतु त्याचे पाकीट, सोन्याची साखळी, अंगठ्या आणि जोडप्याचे चार मोबाईल फोन गायब होते,’’ असे एसपी सायम म्हणाले. (Tragedy with newly wed couple)
मेघालयातील शोध मोहिमेत सहभागी असलेला राजाचा भाऊ विपिन म्हणाला, ‘‘या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.’’ काही ‘संशयित’ गुन्ह्याच्या ठिकाणाबद्दल तपासकर्त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुनेचा शेवटचा कॉल आणि…
राजाच्या आईने हे जोडपे बेपत्ता होण्यापूर्वी सोनमसोबतचे शेवटचे संभाषण काय झाले होते, ते सांगितले. सोनमशी २३ मे रोजी बोलणे झाले होते. उपवासाचा दिवस असल्याने तिने तिची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. तिने नवविवाहित जोडप्याला हायकिंग करत असताना काहीतरी खाण्यास सांगितले, परंतु सोनमने नकार देत, फिरायला आले म्हणून मी माझा उपवास सोडणार नाही, असे सांगितले. कुटुंबाने या कॉलचे रेकॉर्डिंग शेअर केले आहे ज्यामध्ये सोनमला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जाणवते. धबधबा पाहण्यासाठी जंगलात ट्रेकिंग करत आहेत, असे तिने सांगितले होते. त्यानंतर नंतर बोलते असे सांगून हा कॉल अचानक संपतो. त्यानंतर त्यांनी कॉल कधीच घेतला नाही.
हेही वाचा :
भ्रष्टाचारामुळे न्यायव्यवस्थेला धोका : सरन्यायाधीश
मंत्री महाजनांच्या कार्यालयात ३०० फायली पडून