जमीर काझी : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊ नये आणि आम्ही सत्तेत बसू नये, यासाठी अजितदादांचा घातपात झाला असावा, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघाताबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना त्यांनी या दुर्घटनेच्या अनुषंगाने मुंबईत दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत प्रमुख दहा प्रश्न उपस्थित करीत अजित दादांचा घातपात करण्यात आल्याचा दावा पुन्हा एकदा केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सविस्तर सादरीकरण करीत दुर्घटनेबाबत अनेक नवे आरोप केले. त्याचबरोबर अजितदादांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकीसह पार्थ आणि जय हे राजकारणात नवे असल्यानं ते दबावाखाली असल्याचा दावा केला.
ते म्हणाले,”आता तपासयंत्रणांवर दबाव वाढत आहे. कारण, यामध्ये अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे पुरावे हटवले जात आहेत. त्यामुळे आम्ही करत असलेल्या अनेक मुद्द्यांना आता पुष्टी मिळते. दादांचे विमान मुद्दाम पाडलं होत का?, अशी शंका आहे. यामागे राष्ट्रवादीच्या विलीनकरणाचा मुद्दा तसेच विम्याचा अँगल आहे. विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन भरले जेणेकरून अपघातानंतर काहीही वाचू नये”, असा आरोप केला. त्यांनी अपघातासंबधीचे काही नवीन व्हिडिओ दाखवत ते म्हणाले की, “कालच एक नवीन व्हिडिओ मिळाला असून त्यात विमान अपघातानंतर तिथेच स्फोट झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पहिल्या पत्रकार परिषदेत अधिकच्या फ्युअल कॅनचा विषय मांडला होता, ते सिद्ध करणारे हे व्हिडिओ आहेत.
विमानात अधिकचे फ्युअल टँक होते. व्हीएसआरच्या विमानातील कॉकपीटमध्ये व्हेनेजुएलाचा नागरिक असलेला कार्लोस नावाचा व्यक्ती ये-जा करत होता. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय वैमानिक लायसन्स आहे. मात्र, तो भारतात पर्यटक म्हणून यायचा आणि कॉकपीटमध्ये जाऊन विमान उडवायचा. व्हीएसआर कंपनीमध्ये अशा अनेक चुका आहेत. त्या लपवल्या जात आहेत. कारण, कंपनीच्या मालकांचे सत्ताधारी पक्षातील लोकांशी घनिष्ठ संबंघ आहेत”, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला.
ते म्हणाले, ब्लॅक बॉक्ससंदर्भात मी आधीपासूनच शंका व्यक्त केली होती. यात उद्या जाऊन हे कदाचित व्हॉईस रेकॉर्डिंग नाही, डेटा नसल्याची काही कारणं पुढे येऊ शकतात. ती कारणे येऊ लागली आहेत. केंद्र सरकारच्या एएआय एजन्सी ब्लॅक बॉक्समध्ये अडचण असू शकते. काही भाग जळून नष्ट झाला, असे म्हणत आहे. मात्र ११०० डिग्री सेल्सिअस असतानाही तिथे एक तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडले आहे. जर सहा हजार मीटर खोली पर्यंत पाण्याचं प्रेशर असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा विमानातला ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. विमान पडले तिथे बरेच कागद होते, पण ते कमी जळले. स्फोटाचा धक्का काही सेकंदाचा असतो. त्यामुळे कागद जळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय?,त्यामुळे हा प्रवास घातपाताच्या दिशने सुरु झाला आहे. २७ तारखेला संध्याकाळी ६.५० ते ७.०५ मिनिटापर्यंत फोनवर बोलणे झाले होते. एवढीच अपडेट मी देतो, असे सांगून ते म्हणाले की,विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेले तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते. पण मग फ्यूल टँक पूर्ण भरायची गरज नव्हती. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंध भरता आलं असतं ना. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर कोणी असं म्हणेल की इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होते , त्यामुळे इतके फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय ? असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले की,एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला, जास्त आदळू टप्पे घेतो. आपण जर अपघात स्थळी पाहिलं तर अजित दादाचं जे विमान होते, कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं. तर एका साईडला पडलं होतं. त्यामुळे ते जोरात आदळलं. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका घेतली जाते, त्याचं मुख्य कारण, याबद्दल काही शंका व्यक्त करण्यात येत आहे. ती खरी ठरताना दिसत आहेत. अजित दादांच्या त्या विमानात जे फ्यूल टँक होते, ते अधिकचे होते. खरंतर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतात. त्याच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो, असे सांगून
ते म्हणाले की,अकाऊंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डीलिट केलं. त्याचा इंटरव्ह्यू डीजीसीने घेतला. ही माणसे कुठे आहेत . त्यांची चौकशी केली का?. डीजीसीएने काल जी नोटीस दिली त्यात सीसी अकाऊंटेबल मॅनेजर लिहिले पण तो कुठे आहे?. जेट चालवत असाल तर लेगसीचं विमान चालवता येत नाही. पण पायलट कपूर हे दोन्ही विमान चालवत होता. नियमानुसार ते चुकीचं आहे. डीजीसीला सांगायचं की कागदं रंगवू नका. कागदाच फरक दिसला तर योग्य ठरणार नाही, असा इशारा दिला. अपघातामागे विम्याचे कारण व्हीएसआर विमानाची किंमत ३५ कोटी आहे. पण त्याची क्वॉलिटी पाहिली तर ते १० कोटीच्यावर विकले गेले नसते, असे तज्ञाचे मत असून त्यावर ५५ कोटीचा विमा होता.तर २१० कोटीची लाएबिलीटी होती .त्यात मेन पायलटला किती रुपये मिळणार होते ? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला