पुणे/नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये झालेल्या अपघातावेळी ट्रकचालकाचे अपहरण करून नेणाऱ्या कारमध्ये बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर होते, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी (१४ सप्टेंबर) रोजी ही घटना घडली होती. (Road rage kidnapping)
दिलीप खेडकर हे निवृत्त राज्य सरकारी अधिकारी आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते आणि त्यांचा चालक दोघेही फरार झाले आहेत. रविवारी खेडकर यांच्या पुणे येथील बंगल्यातून अपहृत ट्रकचालकाची सुटका करण्यात आली. एसयूव्हीच्या नंबरवरून पोलिसांनी खेडकर यांच्या घराचा माग काढला होता. (Road rage kidnapping)
नवी मुंबई पोलिस खेडकर यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचले. मात्र त्यांना एका तासाहून अधिक काळ बंगल्यात प्रवेश देण्यात आला नाही. याबद्दल पूजाची आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर जेव्हा ते पुणे पोलिसांसह परतले तेव्हा खेडकर यांनी एसयूव्ही बाहेर काढली आणि तिच्या कुत्र्याला परिसरात सोडून दिले. त्याचा आरोपही पोलिसांवर करण्यात आला.
मूळ घटना काय?
ऐरोली रस्त्यावर प्रल्हाद कुमार (२२) हा त्याचा काँक्रीट मिक्सर ट्रक चालवत असताना झालेल्या अपघातानंतर त्याचे अपहरण करण्यात आले होते.
रबाळे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रक एका स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलला धडकला. त्यानंतर कुमार आणि एसयूव्हीमधील दोघा व्यक्तींमध्ये वाद झाला. (Road rage kidnapping)
त्यानंतर एसयूव्हीमधील प्रवाशांनी कुमारला पोलिस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने त्यांच्या गाडीत घालून त्याला पळवून नेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
ट्रक मालकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून, रविवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १३७(२) (अपहरण) अंतर्गत दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिसांनी एसयूव्हीचा माग काढला. ती गाडी पुण्यात असल्याचे समजले.