कोल्हापूर : प्रतिनिधी : नांदणी येथील महादेवी हत्तीणीला वनतारातून कोल्हापूरात परत आणण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची वनताराने दर्शवल्यानंतर राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराच्यावतीने संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. सुर्वोच न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतली असून याचिकेवर गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने याचिका दाखल करुन देण्याची तयारी दर्शवल्याने महादेवी हत्तीण परत येण्याच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mahadevi Hattini case)
महादेवी हत्तीला जामनगर येथील वनतारा राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि एएस चांदुकर यांच्या खंडपीठाने गुरुवारसाठी प्रकरणाची यादी करण्यास सहमती दर्शविली. (Mahadevi Hattini case)
वकिलांनी या प्रकरणाची लवकर यादी देण्याची विनंती करताना वनताराने त्यांच्या मठातील हत्ती जबरदस्तीने नेला आहे असे म्हटले आहे. जुलै महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक, पट्टाचार्य महास्वामी संस्था, मठ (करवीर) कोल्हापूर – एक जैन मंदिर ट्रस्ट यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली, ज्यामध्ये जामनगरमधील राधे कृष्ण हत्ती कल्याण ट्रस्टच्या हस्तांतरणाची शिफारस करणाऱ्या उच्चाधिकार समितीच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते.न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उच्चाधिकार समितीच्या (एचपीसी) युक्तिवादाशी सहमती दर्शवली की हत्तीच्या कल्याणाचा विचार मठातील धार्मिक कार्यांपेक्षा केला पाहिजे, जिथे तो सध्या ठेवला जातो. न्यायाधीशांनी रेकॉर्डवरून असे नमूद केले की हत्ती शारीरिकदृष्ट्या वाईट स्थितीत आहे. (Mahadevi Hattini case)
२८ जुलै रोजी, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कोल्हापूर मंदिर ट्रस्टने (स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था) उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती .याचिका फेटाळताना, खंडपीठाने असेही निरीक्षण नोंदवले होते की: “उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे लवकरात लवकर पालन करावे. हत्तीचा प्रवास लवकरात लवकर करावा आणि कोल्हापूर ते जामनगर प्रवासादरम्यान हत्तीला कोणतीही दुखापत होऊ नये किंवा इतर कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व पावले उचलावीत.” (Mahadevi Hattini case)
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणी येथील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आले. त्यामुळे जनभावना प्रक्षुब्ध झाल्याने महादेवीला परत आणण्यासाठी जनआंदोलन उभारले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी ४५ किलोमीटरची पदयात्रा काढली. पदयात्रेचे रुपांतर मोर्चात होऊन हजारो नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. विरोधी पक्षांसह सत्ताधारी लोकप्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतली पण सुनावणी लांबणीवर पडली आहे. मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली पीठासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकार आणि वनतारा दोघे मिळून महादेवीला हत्तीला सहाय्य करणार आहेत. वनाताराने नांदणी येथे वनताराचे दुसरे पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले. (Mahadevi Hattini case)