नागपूर : शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी सुरू केलेल्या चक्काजाम आंदोलनाने वाहतूक कोंडी झाली आहे. या आंदोलनाची दखल घेऊन नागपूर खंडपीठाने बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशावर शेतकरी नेते चांगलेच संतापले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारने शिखंडीचा डाव टाकला आहे, अशी टीका केली. आम्ही सरेंडर व्हायला तयार आहे. मात्र आम्हाला कुठे घेऊन जाणार ते सांगा असा सवालही शेट्टी यांनी केला आहे. (Nagpur Chakkajam)
बच्चू कडू यांनी न्यायालयाची प्रत आमच्याकडे पोहोचल्यावर आम्ही विचार करु. उद्या आंदोलन आक्रमक असेल असा इशाराही त्यांनी दिला. न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण पोलिसांनी आम्हाला नेण्यासाठी यावे आणि आमची व्यवस्था तुरुंगात केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
नागपूर खंडपीठाचे रस्ते मोकळे करण्याचे आदेश
माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा नागूपरमध्ये पोहोचलेला आहे. बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांतून आंदोलक नागपूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी नागपूर-हैदराबाद मार्ग रोखून धरला आहे. नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा फटका वाहतुकीला बसला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दाखल करुन घेत हे आंदोलन संध्याकाळी सहा पर्यंत थांबवण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. यानंतर न्यायालयाचा आदेश घेऊन नागपूर पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. तेव्हा आंदोलकांनी आम्हाला अटक करा, असा पवित्रा घेतला आहे. (Nagpur Chakkajam)
सरकारमध्ये बसलेल्या म्होरक्यांचा डाव
न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा नाही, हे सरकारने आधीच ठरवले आहे. त्यामुळेच त्यांनी असा शिखंडीचा डाव टाकला आहे. दिवसभर सरकारच्यावतीने एकही मंत्री आंदोलकांच्या भेटीला आलेला नाही, आणि संध्याकाळी कोर्टाचा आदेश निघतो की, आंदोलकांनी रस्ते मोकळा करावा. सरकारमध्ये बसलेल्या म्होरक्यांचा हा डाव त्यांच्यावर उलटवला पाहिजे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.
न्यायव्यवस्थेचा आदर, शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी
आम्ही संविधानाचा आदर करतो म्हणून न्यायव्यवस्थेचाही आदर करतो. मात्र न्यायव्यवस्थेने शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली पाहिजे. न्यायालय म्हणजे काही ब्रम्हदेव नाही. आधी संविधान निर्माण झाले आणि संविधानातून न्यायव्यवस्था निर्माण झाली. मात्र आता न्यायव्यवस्थाही भरकटत चालली आहे का, अशा प्रश्न निर्माण होत आहे. आम्ही दोन्ही हात वर करुन सरेंडर व्हायला तयार आहे. मात्र आम्हाला कुठे घेऊन जाणार ते सांगा, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. (Nagpur Chakkajam)