धनबादः झारखंडमधल्या धनबादच्या बाघमारा परिसरातल्या त्या घरात काही दिवसांपूर्वीपर्यंत सगळं काही सामान्य दिसत होतं. वडील रोज कामावर जात होते. मुलगा नोकरीच्या शोधात होता. कुठल्याही घराप्रमाणं या घरातही मुलाच्या भविष्याबद्दलच्या चर्चा होत असतील, काळजी असेल, आशावादही असेल. (Son murdered father for job)
अशा या घरात एक विचार शांतपणे वाढत होता. तो विचार होता – “वडील नसतील, तर मला नोकरी मिळेल.”
एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशी ही स्टोरी आहे. पण ती वास्तव आहे. आणि म्हणूनच अधिक अस्वस्थ करणारी आहे.
वीस जूनची ती पहाट होती. अजून पुरते उजाडले नव्हते. धनबादमधील चिटाही-बरोरा रस्त्यालगत एक पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालत होता. अचानक त्याच्या नजरेस रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह दिसला. काही तासांत पोलिस आले, तपास सुरू झाला आणि एका कुटुंबाची भयंकर शोकांतिका समोर आली, ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला.
पोलिसांना सुरुवातीला हा नेहमीसारखा एक खून वाटला. मात्र तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या हत्येमागचे सत्य उलगडू लागले. (Son murdered father for job)
मृत व्यक्तिचं नाव होतं तुलेश्वर नोनिया. कोल इंडिया समूहातील बीसीसीएलशी संबंधित कामगार. आयुष्यभर कष्ट करून संसार उभा करणारे एक सामान्य गृहस्थ.
आणि त्यांचा खून घडवून आणणारा होता त्यांचाच मुलगा (Son murdered father for job)
पोलिसांच्या मते, विजय नोनिया अनेक वर्षांपासून बेरोजगार होता. नोकरीसाठी प्रयत्न सुरू होते. पण यश मिळत नव्हते. अशात त्याच्या लक्षात आलं की, वडिलांचा मृत्यू झाल्यास बीसीसीएलमध्ये अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळू शकते.
भारताच्या औद्योगिक पट्ट्यात अनुकंपा नोकरी ही केवळ सरकारी तरतूद नाही; ती अनेक गरीब कुटुंबांसाठी भविष्याची हमी मानली जाते. अनेकदा वडिलांच्या निवृत्तीपेक्षा त्यांच्या नोकरीची जागा अधिक महत्त्वाची ठरते. काही घरांत मुलांच्या भवितव्याची गणितेही त्याभोवती फिरत असतात.
पण विजयनं हे गणित एका भयंकर टोकापर्यंत नेलं. (Son murdered father for job)
त्याने दोन जणांना दहा लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांना संपवण्याची जबाबदारी सोपवली. संधी साधून तुलेश्वर नोनिया यांना निर्जन ठिकाणी नेण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली.
या घटनेत सर्वाधिक वेदनादायक काय आहे?
हत्या? की त्या हत्येमागील कारण?
कारण ही एखाद्या वैरातून, संपत्तीच्या वादातून किंवा सूडातून घडलेली हत्या नाही. ही हत्या घडली एका नोकरीसाठी.
एका नियुक्तीपत्रासाठी.
एका मासिक पगारासाठी.
एका स्वाक्षरीसाठी.
तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा आरोपींना अटक केली, तेव्हा त्यांच्याकडून रक्ताने माखलेला दगड, मोटारसायकल आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले. त्यानं गुन्ह्याची कबुलीही दिली. (Son murdered father for job)
पण न्यायालयात सिद्ध होणाऱ्या गुन्ह्यापलीकडंही या प्रकरणाची एक दुसरी बाजू आहे.
ती म्हणजे समाजाची.
आज भारतातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. अनेकांच्या घरात निराशा आहे. अनेक कुटुंबं आर्थिक तणावातून जात आहेत. पण प्रत्येक घरात हत्या होत नाही. प्रत्येक मुलगा खुनी होत नाही.
म्हणूनच या घटनेकडे केवळ बेरोजगारीच्या चष्म्यातून पाहता येणार नाही.
ही कथा आहे मूल्यांच्या ढासळण्याची
नात्यांच्या अवमूल्यनाची.
माणसाच्या किंमतीपेक्षा संधीची किंमत मोठी ठरण्याची.
एक काळ होता, जेव्हा बाप मुलासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करायचा. आजही लाखो बाप तसेच जगतात. पण धनबादमधील या घटनेनं एक अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे—आपण मुलांना यशाची भाषा शिकवताना नात्यांची भाषा विसरत आहोत का?
तुलेश्वर नोनिया यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा होईल. न्यायालय निर्णय देईल.
मात्र या घटनेचा खरा निकाल न्यायालयात लागणार नाही.
तो आपल्या समाजाच्या मनात लागेल. कारण ही फक्त एका बापाच्या खुनाची कथा नाही.
ही त्या काळाची कथा आहे, जिथे काही जणांना नोकरी मिळवण्यासाठी वडिलांच्या मृत्यूची वाट पाहणं पुरेसं वाटत नाही.