मुंबई/ठाणे : मुंबई महानगरीसह ठाण्यात दहीहंडीचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवात मोठ्या संख्येने राजकीय नेतेही नेहमीप्रमाणे सहभागी झाले आहेत. (CM in Dahihandi)
महायुतीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनीही विविध ठिकाणी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी हजेरी लावली. टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी महत्त्वाचे विधान केले.
आगामी काळात मुंबईसह सर्व महापालिकांची हंडी आम्ही फोडणार आहोत, असे ते म्हणाले. (CM in Dahihandi)
महापालिका कारभारातील लोणी काही विशिष्ट लोकांकडेच जात होते. ते आता तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.
फडणवीस यांनी ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान, कपिल पाटील फाऊंडेशन, स्वामी प्रतिष्ठान, नवयुग मित्रमंडळ आदींच्या दहीहंडीलाही उपस्थिती दर्शवली. (CM in Dahihandi)
२२३ थरांची हंडी फोडली : शिंदे
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने २२३ थरांची दहीहंडी फोडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकामध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार बाजी मारणार, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे यांनी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे गटावर टीका केली.
उत्साहाला गालबोट; एका गोविंदाचा मृत्यू
दरम्यान, मुंबई, ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह कायम आहे, तथापि, दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना काही गोविंदा थरावरून कोसळल्यामुळे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत एकूण ३० गोविंदा जखमी झाले आहेत, तर बाल गोविंदांसाठी दहीहंडी उभारण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. दुपारी तीनच्या सुमारास बाल गोविंदांसाठी दहीहंडी उभारत असताना ३० वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी हे खाली पडले. त्यांना तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.