नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्ले-ऑफ सामन्यांची ठिकाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. त्याचप्रमाणे प्ले-ऑफच्या दोन लढती मुल्लनपूर येथील न्यू पीसीए स्टेडियमवर रंगतील. (IPL Venue)
बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी याबाबतची घोषणा केली. २९ मे रोजी होणारी पहिला क्वालिफायर सामना व ३० मे रोजीचा एलिमिनेटर सामना मुल्लनपूर येथे रंगणार आहे. यातील पहिला सामना गुणतक्त्यातील आघाडीच्या दोन संघांमध्ये खेळवण्यात येणार असून त्यातील विजेत्या संघास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. एलिमिनेटर सामना गुणतक्त्यातील तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघांमध्ये होणार असून यातील विजेता संघ दुसऱ्या क्वालिफायर लढतीसाठी पात्र ठरेल. १ जून रोजीचा दुसरा क्वालिफायर सामना, तसेच ३ जून रोजीचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. क्वालिफायर-१ मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर सामन्यातील विजेता संघ यांच्यामध्ये क्वालिफायर-२ सामना होईल. (IPL Venue)
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा अंतिम सामना कोलकात्यामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार होता. त्याचप्रमाणे, प्ले-ऑफच्या लढती हैदराबादमध्ये होणार होत्या. तथापि, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे पूर्व भारतात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्यांची ठिकाणे बदलण्यात आली. दरम्यान, २३ मे रोजी रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यानचा सामनाही बेंगळुरूहून लखनौला हलवण्यात आला आहे. बेंगळुरूचा संघ २७ मे रोजी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धचा साखळीतील अखेरचा सामनाही बेंगळुरूऐवजी लखनौलाच खेळेल. बेंगळुरू येथे काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हे सामने रद्द होण्याची भीती होती. बेंगळुरूचा १७ मे रोजीचा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा घरच्या मैदानावरील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
हेही वाचा :
यशस्विनी-दिया यांची महिला दुहेरीत आगेकूच