कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी राज्य सरकारने आधीच पावले उचलली आहे. त्यासाठी निधी दिला आहे. कामे सुरू आहेत. तेथील सोयी-सुविधा आणि लोकेशनची कामे दर्जेदार व्हावीत, शूटिंगसाठी वेगवेगळ्या इमारती व्हाव्यात, यासाठी आणखी १०-१५ कोटींचा देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी (१८ सप्टेंबर) येथे केली. (Ashish Shelar assurance on Chitranagari)
‘महाराष्ट्र दिनमान’ वेब पोर्टल आणि यु ट्युब चॅनेलचा पहिला वर्धापनदिन येथील हॉटेल सयाजी येथे साजरा झाला. त्यानिमित्त आयोजित ‘दिनमान सन्मान’ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती होते.(Ashish Shelar assurance on Chitranagari)
चित्रनगरीमध्ये केवळ सुविधा उभारल्या म्हणजे पुढे काही करण्याची गरज नाही, असे नाही तर येथे केवळ दक्षिण भारतच नव्हे; तर देशभरातील चित्रपटनिर्मितीचे केंद्रबिंदू म्हणून कोल्हापूर उदयाला यावे, या अनुषंगाने तशी मनुष्यबळ निर्मितीही व्हावी, असे मत व्यक्त करून मंत्री शेलार म्हणाले, ‘‘चित्रपटनिर्मितीसाठी लागणारे विशेष तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे, यासाठीचे अभ्यासक्रम आम्ही मुंबईत सुरू केले आहेत. कोल्हापुरातसुद्धा तशी ट्रेनिंग इन्स्टिट्युट आम्ही सुरू करणार आहोत,’’ अशी घोषणाही त्यांनी केली.
केवळ चित्रपटनिर्मितीच नव्हे तर सध्या कन्टेट क्रिएशनला जगभरात मोठी मागणी आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. ती भागविण्यासाठीची एक शैक्षणिक व्यवस्थाही उभारावी, हा दृष्टिकोन यामागे आहे. या माध्यमातून येथील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, पर्यटन वाढावे आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू कोल्हापूर चित्रनगरी बनावी, यादृष्टीने चित्रनगरीच्या विकासासाठी जी मुक्त चर्चा आयोजित केली आहे. त्या चर्चासत्रातून येणाऱ्या अर्काला सरकारी बाबूंच्या तर्कात घालण्याची जबाबदारी मी घेतो, असे स्पष्ट आश्वासनही मंत्री शेलार यांनी दिले.(Ashish Shelar assurance on Chitranagari)
विश्वासार्हता हीच ‘महाराष्ट्र दिनमान’ची ताकद
डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल ही तिन्ही माध्यमे आजही तितकीच महत्त्वाची आहेत. यापुढे ‘एआय’चा काळ आहे, या सगळ्यांची गरज लागणार आहे. या सगळ्यांतून आपण घेतले काय पाहिजे तर यामध्ये सर्वांत महत्त्वाची विश्वासार्हता आहे. महाराष्ट्र दिनमानने डिजिटल माध्यमातही आपले स्थान निर्माण केले. त्यामागे विश्वासार्हता ही ताकद आहे, असे गौरवोद्गारही श्री. शेलार यांनी काढले.
महाराष्ट्र दिनमानने समाजातील ज्या कर्तृत्ववान लोकांचा सन्मान केला त्यांनी केलेले काम देशाला गौरवास्पद आहे. महाराष्ट्रालासुद्धा गौरवास्पद आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला याचा अभिमान आहे. सहकार, सामाजिक, क्रीडा, कला क्षेत्र असेल त्या क्षेत्रातील त्या व्यक्तीचा सत्कार जरूर आहे, पण त्याचवेळी ती व्यक्ती किंवा संस्था ज्या क्षेत्रात काम करते त्याभोवतीच्या वायूमंडलाचाही तो गौरव असतो, असे मत शेलार यांनी मांडले.
यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि खासदार धनंजय महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले.(Ashish Shelar assurance on Chitranagari)
ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, दि. बा. पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनमान सन्मानप्राप्त मान्यवर
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी. पी. साबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे, श्रमिक-कष्टकऱ्यांचे नेते डॉ. भारत पाटणकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्रसिद्ध अभिनेते, कवी आणि गीतकार किशोर कदम उर्फ सौमित्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या टेबल टेनिसपटू, अर्जुनपुरस्कार प्राप्त शैलजा साळोखे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, कला आणि जाहिरात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ‘निर्मिती’ संस्थेचे प्रमुख अनंत खासबारदार.
संस्था पुरस्कार गटात वैभव नायकवडी (पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, वाळवा) आणि गणी आजरेकर (दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी-मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर). कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया दंडगे यांनी केले.