कोल्हापूर : प्रतिनिधी : विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे छत्रपती राजाराम साखर कारखाना कर्जबाजारी झाला असल्याचा आरोप मोहन सालपे आणि दत्तात्रय उलपे यांनी पत्रकार परिषदेत केला. परिवर्तन आघाडीच्या सभासदांनी सत्ताधाऱ्यांवर कारखान्याच्या अहवालाचा दाखला देत प्रमुख सहा प्रश्न विचारले असून राजाराम कारखाना कर्जबाजारी केल्याचा आरोप केला. (MLA Mahadik)
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सोमवार (दि.२९) रोजी होत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, माजी जि.प. सदस्य बाजीराव पाटील, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. (MLA Mahadik)
यावेळी बोलताना समन्वयक मोहन सालपे आणि दत्तात्रय उलपे म्हणाले, कारखाना मालकीची ८.८४.९६ हेक्टर इतकी जमीन आहे. त्याचे शासकीय मुल्यांकन ४३ कोटी ३१ लाख ६९ हजार इतकी होत असताना, कारखान्याने मागील दोन वर्षात किंमत वाढवून ती २७७ कोटी रुपये दाखवली आहे. म्हणजेच जमिनीची किंमत गेल्या दोन वर्षात २३९ कोटींनी वाढवून दाखवून शासनाची, बँकांची व वित्तीय संस्थांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. (MLA Mahadik)
कारखाना स्वतःचे उत्पन्नातून दरवर्षी पूर्णपणे एफआरपी भागवू शकत नाही. दरवर्षी २५ ते ३० कोटी रुपयांनी शॉर्ट मार्जिन वाढत आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या वतीने उभा करण्यात येत असलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्प व मशीनरी आधुनिकीकरण प्रकल्पाच्या उभारणीत होत असलेल्या दिरंगाईस जबाबदार कोण ? असा सवाल ही यावेळी करण्यात आला. (MLA Mahadik)
कारखान्याच्या कार्यक्षेत्र वाढीबाबत कोल्हापूर जिल्हयाबाहेरील सांगली जिल्ह्यातील सभासद करून घेण्याबाबत आम्ही विरोध करून हरकत घेतली होती. पण राजाराम कारखान्याने राजकीय दबावाने या पोटनियम दुरुस्त्या मंजूर करून घेतल्या. यावर आम्ही सहकार मंत्र्यांकडे अपील केल्याचे यावेळी सांगितले.
छत्रपती राजाराम कारखान्याच्या संस्थापक सभासदांच्या सरळ व कायदेशीर वारसांनी कारखान्याकडे वेळोवेळी सभासद करून घेण्याबाबत मागणी केली आहे. पण सत्ताधारी गट सभासदांची दिशाभूल करून अशा वारसदार सभासदांना सभासद करून घेण्यास जाणून बुजून टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे गटतट न पाहता सर्वच पात्र मयत सभासदांच्या वारसांना ताबडतोब सभासद करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
मयत सभासदांच्या नावे असणारी साखर २०२३ ची निवडणूक झाल्यापासून बंद करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले आहे. संचालक अन्य मार्गाने ही साखर लांबवत आहेत का?, कारखाना देय एफआरपी इतकेही उत्पन्न मिळवण्यात अपयशी ठरला आहे याला जबाबदार कोण?, गेल्या आठ वर्षापासून ऊस उत्पादक सभासदांच्या परतीच्या व बिन परतीच्या ठेवींची जवळपास पाच कोटी रक्कम कारखान्याने बेकायदेशीरपणे व अनाधिकाराने डिबेंचर्स मध्ये वर्ग केली आहे. या रकमेला कारखाना कोणतेही व्याज देत नाही. सदर रकमेवरील व्याजाची तरतूद कारखाना दरवर्षी करत होता त्यामुळे सर्व रकमेवरील व्याजाची रक्कम सभासदांना त्वरित परत करावी. (MLA Mahadik)
कारखान्याच्या एका ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टरकडे ॲडव्हान्स घेतलेली एक कोटी इतकी रक्कम येणे आहे ही रक्कम खरोखरच त्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे की सत्ताधाऱ्यांनी ही रक्कम लांबवली असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना करण्यात आला. तसेच २०२४-२५ सालात ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टरना दिलेल्या अॕडव्हान्सपैकी ११ कोटी ४३ लाख इतकी रक्कम येणे आहे. ही येणे बाकी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. याची वसुली संचालकांकडून करण्यात यावी.
या पत्रकार बैठकीला दत्तात्रय उलपे, दत्तात्रय मासाळ, मारुती पाटील, रमेश रणदिवे, मिलिंद पाटील, तानाजी बिरंजे, प्रदीप उलपे, तानाजी चव्हाण, दिलीप मेडशिंगे, रघुनाथ चव्हाण (कांडगाव), विलास पाटील (भुये) बी. आर. पाटील (वडणगे), दिलीप पाटील (टोप), पांडुरंग पाटील, विकास चौगले, जयसिंग पाटील (शिये), बाबासाहेब देशमुख (पु.शिरोली), मारुती मगदूम, यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद संख्येने उपस्थित होते.