सोलापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे वन्यजीव अभ्यासक, प्रतिभावंत साहित्यीक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील निवासस्थानी निधन झाले. सोलापूरात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते. (Maruti Chitamaplli Death)
नुकतेच त्यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी रुग्णालयात निधन झाले. (Maruti Chitamaplli Death)
मारुती चितमपल्ली यांनी वनाधिकारी म्हणून काम करताना जंगलात मोठी भटकंती केली होती. त्यांचा पक्षी आणि प्राण्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी आपले आयुष्य जंगलातील अभ्यासात घालवले. ते पक्षीकोश आणि मत्सकोशाचे निर्माते होते. त्यांना अरण्यऋषी म्हटले जायचे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंत स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर, बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय अध्यान डेहराडून येथील वने आणि वन्यजीव संस्थामधून त्यांनी शिक्षण घेतले. महाराष्ट्राच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उप संचालक पदावर कार्यरत असताना १९९० मधून ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान होते. (Maruti Chitamaplli Death)
मारुती चितमपल्ली यांची साहित्यसंपदा
जंगलातील अनुभवावर मारुती चितमपल्ली यांनी विपुल लेखन केले. त्यांची पुस्तके हा अभ्यासाचा खजिना आहे. पक्षी जाय दिंगतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, रातवा, घरट्यापलिकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, निळावंत, चैत्रपालवी, केशरांचा पाऊस, ही त्यांची महत्वाची पुस्तके आहेत. (Maruti Chitamaplli Death)