मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करून घोडचूक केली असून, ही चूक महाराष्ट्राला भविष्यात महागात पडू शकते. काँग्रेससह सत्ताधारी भाजप आणि प्रचलित राजकीय पक्षांच्या परराज्यीयधार्जिण्या धोरणाविरुद्ध मराठी जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनाम्याला पर्याय म्हणून मराठी अभ्यास केंद्राने ‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा’ जाहीर केला आहे.
मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीसाठी कार्यरत विविध संस्था, संघटना, गट व कार्यकर्त्यांची जाहीर बैठक दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात काल बुधवारी झाली. या बैठकीत मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘मराठीनामा’ ठरवण्यात आला. बैठकीस मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, शिवराज्य ब्रिगेडचे अमोल जाधवराव, संभाजी ब्रिगेड पक्षाचे अध्यक्ष व संयुक्त महाराष्ट्र समितीचे संयोजक सुहास राणे, मराठी शाळांच्या सदिच्छादूत आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (‘MarathiNama’ announced for the Municipal Corporation elections)
डॉ. दीपक पवार यांनी बोलताना सांगितले की, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म यासाठी आजवर गळे काढणारे राजकीय पक्ष मराठीकारणासारख्या मुद्द्यांवर अपयशी ठरले आहेत. काँग्रेसने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढणे हा संतापजनक व विघातक प्रकार आहे. त्यामुळेच मराठी अभ्यास केंद्राने ‘मराठीनामा’ जाहीर केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जनसंस्थांना निवडणुकीत खऱ्या अर्थाने जनतेचा पाठिंबा मिळवतो आहे का, हे संस्थांनी सातत्याने पडताळून पाहायला हवे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यावर बोलतात, पण त्यातून मराठी जनतेचे खरेच भले होते का, यावर विचार करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. एखाद्या मुद्द्यावर एकाच वेळी सर्वांचेच एकमत होईल असे नाही. पण, सर्वांना सोबत घेऊन जायचे तर काही मुद्द्यांसाठी उगाच ताणून न धराता आपण एकत्र येऊन पुढे गेले पाहिजे, याकडेही डॉ. पवार यांनी लक्ष वेधले. (‘MarathiNama’ announced for the Municipal Corporation elections)
शिवराज्य ब्रिगेडचे अमोल जाधवराव यांनी सांगितले की, मराठीच्या मुद्द्यावर विविध संस्था स्वतंत्रपणे काम करत असल्या तरी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आघाडी स्थापन झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत आघाडीने आठ उमेदवार दिले असून, ते मराठी जनतेचा जाहीरनामा घेऊन काम करतील. अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देताना आघाडीच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहण्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संभाजी ब्रिगेड पक्षाचे अध्यक्ष सुहास राणे यांनी सांगितले की, मराठी अभ्यास केंद्राची भूमिका आम्हाला पटते. ‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा’ हे नाव आम्हाला भावले असून, निवडणूक मोहिमेत आम्ही याच नावाने जाहीरनामा घेऊन जाणार आहोत. मुंबईतील मराठी टक्का घटत चालल्याने मराठी माणसाला नोकरी, व्यवसाय व कामधंदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले. (‘MarathiNama’ announced for the Municipal Corporation elections)
महापालिकेसाठी मराठीनामा – ठळक मुद्दे…
राजकीय पक्ष आणि धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्या. जिथे एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथे मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्त्व देणार्या उमेदवाराला प्राधान्य द्या. सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलणार्या उमेदवारालाच पसंती द्या. निवडणुकीचा प्रचार, प्रसार मराठीतून करणार्या उमेदवारालाच प्राधान्य द्या. स्थलांतरितांसाठी महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक ओळख पुसून टाकणार्या मराठी/ अमराठी उमेदवाराला नाकारा.
महानगरपालिका प्रशासनाकरिता
महानगरपालिका प्रशासनाकरिता महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह पालिकेचे सर्व प्रकारचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार, खरेदी आदेश, पावत्या मराठी भाषेतच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महानगरपालिका हद्दीतील दुकानांच्या पाट्या मराठीत नसणार्या दुकानदारांवर कठोर आणि तातडीने दंड वसूल करावा. अंमलबजावणीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मांसाहारावरून घरं नाकारणाऱ्या इमारतींना तात्काळ अनधिकृत ठरवून त्यांचे पाणी, वीज तत्काळ कापून टाकावे तसेच, ओसी आणि अग्निरोध प्रतिबंधक प्रमाणपत्र रद्द करावे. महानगरपालिका हद्दीतील रस्ते, चौक, बागा, क्रीडांगणे, मैदाने यांना मराठी व्यक्ती, मराठी संस्कृती यांच्या प्रतीकांची नावे द्यावीत. महानगरपालिका हद्दीतील मराठी भाषेवरील अन्यायाची तक्रार नोंदविण्यासाठी प्रभागनिहाय एक खिडकी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. मुंबई शहराचे ‘मराठीपण’ सार्वजनिक ठिकाणी दृश्यमान होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. रस्ते, सार्वजनिक इस्पितळे, वाहतूक व्यवस्था, उद्याने, नाटक व चित्रपटगृहे, सभागृहे इ.ठिकाणी मराठीचा वापर प्राधान्याने व ठळकपणे झाला पाहिजे.
महानगरपालिकेतील संधी आणि प्राधान्य महापालिकेतील किमान ८० टक्के कंत्राटे मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच मिळायला हवीत.महापालिकेच्या नोकरभरतीत ८० टक्के प्राधान्य मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच मिळायला हवे. फेरीवाला ओळखपत्र देताना ८० टक्के प्राधान्य मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच मिळायला हवे. महानगरपालिका हद्दीत व्यवसायासाठी परवाना देताना ८० टक्के प्राधान्य मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांनाच द्यावे. परराज्यीय नागरिकांना व्यवसाय परवाना देताना स्थानिक मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्या यांच्या सहभागीदारीची अट घालावी.
महानगरपालिकेच्या शाळांकरिता मराठी माध्यमाच्या अनुदानित व गुणवत्तापूर्ण शाळा चालवणे हीच मुंबई महानगरपालिकेची प्राथमिकता व धोरण असल्याचे कृतीतून सिद्ध करावे. महानगरपालिकेने कोणत्याही परिस्थितीत मराठी वगळता इतर प्रादेशिक भाषांमधील नवीन शाळा काढू नयेत. मराठी शाळांचे शिक्षण मंडळ बदलताना मराठी शाळेचे माध्यम बदलून इंग्रजी माध्यम करू नये. केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळांच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्याच काढाव्यात. मराठी शाळांच्या धोकादायक इमारती पाडल्यास तिथे नवीन मराठी शाळाच पूर्ण क्षमतेने उभारली गेली पाहिजे.
महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधा परराज्यांतून आलेल्या नागरिकांना त्यांचे सण, उत्सव साजरे करण्यासाठी महानगरपालिकेने मराठी सणउत्सवांप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवू नयेत. सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांना, कल्याणकारी योजनांना मराठी भाषेचा सन्मान करणारी नावे द्यावीत. उदा. नाना-नानी पार्क ऐवजी आजी-आजोबा उद्यान इत्यादी. हिंदी-इंग्रजीचा वापर टाळावा.
संयुक्त महाराष्ट्र आघाडीतील सहभागी संघटना संभाजी ब्रिगेड पार्टी, बहुजन जनता पक्ष, लोक संघर्ष पक्ष, शिवराज्य ब्रिगेड, छावा ब्रिगेड, संयुक्त मराठी मुंबई चळवळ, स्वायत्त महाराष्ट्र अभियान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी एकीकरण समिती, जय भीम आर्मी, बहुजन रक्षक सामाजिक संघटना, जनसेना, हिंद श्रमिक क्रांती सेना, इंद्रधनु हिंद संघ, क्षत्रिय मराठा समाज सेवा संस्था, सेवार्पण प्रतिष्ठान, स्थानिक मच्छीमार नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन, बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटना, राष्ट्रमाता जिजाऊ युवा मंच, शंभुराजे फाउंडेशन, शिवराज्य कामगार संघटना, संभाजी ब्रिगेड कामगार संघटना, पश्चिम महाराष्ट्र युवा संघ.
Tag: