जालना: येथील नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दु शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘ दु:खी ‘ राज्यकाव्य पुरस्कार प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांना, तर ना. धों. महानोर पुरस्कार कवयित्री मीनाक्षी पाटील यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदा २८ वे वर्ष आहे. दुःखी पुरस्कार २५ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह तर महानोर पुरस्कार दहा हजार रुपये रोख आणि स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या गुढीपाडव्यास गुरुवारी (दि.१९) सायंकाळी सात वाजता जालना येथे ‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका, कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर, अनुभव प्रतिष्ठान चे सचिव पंडितराव तडेगावकर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची सुरेल काव्यमैफल रंगणार आहे. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘ दु:खी ‘ राज्यकाव्य पुरस्कार यापूर्वी बलवंत धोंगडे, वृषाली किन्हाळकर, फ.मुं.शिंदे, भगवान देशमुख, रामदास फुटाणे, इंद्रजीत भालेराव, कैलास भाले, नीरजा, मनोज बोरगावकर, लोकनाथ यशवंत, विष्णू सूर्या वाघ, राजन गवस, प्रज्ञा दया पवार, अरुणा ढेरे, अनुराधा पाटील, रेखा बैजल, दासू वैद्य, सौमित्र, विजय चोरमारे, प्रकाश होळकर आदींना देण्यात आला आहे. ना. धों. महानोर पुरस्कार यापूर्वी रफिक सूरज आणि इंद्रजित घुले यांना देण्यात आला आहे.
यंदा निवड करण्यात आलेल्या ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे वाटेवरच्या कविता आणि कवितेच्या वाटेवर असे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे कवितावाचनाचे कार्यक्रम देशविदेशात झाले आहेत. ना. धों. महानोर पुरस्कार प्राप्त मीनाक्षी पाटील या कवी, चित्रकार, ललित लेखिका आहेत. त्यांचे “इज इट इन युअर डीएनए” आणि “ललद्यदस् ललबाय” हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. “उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता” (समीक्षा ग्रंथ) “खानदेशी म्हणी व वाक्प्रचार :एक लोकाभ्यास” आणि “साधन डायरी” हे अनुवादित ग्रंथ प्रकाशित आहेत.