मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरातमध्ये हिंदी भाषेची सक्ती नसताना महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का? असा सवाल मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत कुठल्या शाळा हिंदीची सक्ती करतात हे बघून घेऊ असा अल्लिमेट ठाकरे यांनी दिला आहे. ठाकरे यांच्या इशाऱ्याने पुढील काही काळात हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघणार आहे. (Raj Thakare PC)
मुंबईत राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. राज्यात हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारला दोन पत्रे पाठवली असून आज तिसरे पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी सक्तीवर आपण पहिल्यांदा आवाज उठवला असून यापुढे उठवत राहणार असे ते म्हणाले. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणार नाही असे राज्य सरकार म्हणत असताना पाठ्य पुस्तके छापण्याची गरज काय असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याने स्थानिक भाषा लक्षात घेऊन हिंदी भाषा शिकवण्याबाबत निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वात जास्त बोलली जाते. तसेच हिंदी भाषा बोलली जाते. इयत्ता पाचवी पासून हिंदी भाषा ऐच्छिक आहे. महाविद्यालयात ऐच्छिक आहे. मग पहिलीपासून कोवळ्या मुलांवर हिंदी भाषेची सक्ती राज्य सरकार का करत आहे हे आपल्यास समजत नाही असेही ते म्हणाले. (Raj Thakare PC)
हिंदी भाषेची सक्ती करण्यात आएएस अधिकाऱ्यांची लॉबी कारणीभूत आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यांना मराठी भाषा बोलताना अडचणी येत असल्याने पहिल्यापासून हिंदीची सक्ती केली की सर्वजण हिंदी बोलतील. महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शेजारच्या मोदी शहांच्या गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नसताना महाराष्ट्रात का असा सवालही त्यांनी केला. हिंदी लादली तर मराठी भाषा संपून जाईल. हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यातील संपादक, पत्रकार, साहित्यीकांनी आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. (Raj Thakare PC)