देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला. ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल.स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने देशाची सेवा करण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी योगदान दिले. आज ते आपल्यात नाहीत आणि त्यामुळे होणारी अस्वस्थता वेगळी आहे. मनमोहन सिंग यांचा पिंड हा राजकारणी नव्हता. ते एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते, विचारवंत होते आणि सतत देशाचे भवितव्य घडविण्यासाठी काय करायची आवश्यकता आहे, याचा विचार करण्याची भूमिका घेत होते.त्यांचा आणि माझा परिचय हा मुंबईत झाला होता. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत काम करत होते. त्यामुळे साहाजिकच कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आमचा सुसंवाद होत असे. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्याबद्दलचे आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झाले. नंतरच्या काळात चंद्रशेखरसिंह हे देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या कार्यकाळात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांचे जे काही सहकारी होते. त्यांच्यामध्ये मनमोहन सिंग सुद्धा होते. त्यानंतरच्या काळात नरसिंहराव यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी आणि मी तेव्हा संरक्षण मंत्री होतो.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या ज्या एक दोन समित्या तयार करण्यात यायच्या, त्यामध्ये आम्ही दोघे सुद्धा होतो. त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचे विविध विषयातील निर्भीड विचार ऐकण्याची संधी मिळत असे. ते मितभाषी होते, पण आपल्या भूमिकेशी पक्के होते. देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्या १० वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. आर्थिक संकटाच्या काळात देशाला सावरण्याचे काम त्यांनी नरसिंहराव पंतप्रधान असताना केले आणि स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अधिक भरीव असे निर्णय घेऊन देशाला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढले. त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले आणि सबंध देशाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचे काम त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांची मोठी प्रतिष्ठा होती.-शरद पवारदेशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला:
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या कार्याचा पाया रचला
भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचे निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया त्यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे,-उपमुख्यमंत्री अजित पवारदूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले
डॉ मनमोहन सिंग यांनी आधी वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असतांना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलली आणि अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली. साध्या सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले आहे.-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमहान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी काळाच्या पडद्याआड
देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा त्यांनी पाया घातला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे.
-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी संसदपटू गमावला –
डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे.– राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनइतिहास त्यांचा गौरव करेल
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावे, यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. सिंग आहेत. त्यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवले ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेला नाही.-राज ठाकरेभारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे नेतृत्व हरपले
डॉ. मनमोहनसिंग यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच भारताने आर्थिक क्षेत्रात जगात मोठा टप्पा गाठला आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व, मितभाषी असणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे दूरदृष्टीचे नेतृत्व हरले आहे, आव्हानात्मक काळात त्यांनी भारताला अत्यंत आवश्यक असलेले आर्थिक नेतृत्व, जागतिक मान्यता, स्थिरता आणि एकता प्रदान केली. उगवत्या भारताच्या इतिहासात एक अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून त्यांचे योगदान कायमचे कोरले जाईल. डॉ. मनमोहनसिंग यांचा वारसा परिवर्तनशील नेतृत्वाचा आहे, जो पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहिल.-खा. वर्षा गायकवाड
Manmohan Singh Passed away
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल अमेरिका, रशिया आणि चीनसह जगभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. एक निष्कलंक चारित्र्य असलेला नेता, मुत्सद्दी आणि सकारात्मक राजकारण करणाऱ्या सर्वसमावेशी नेता भारताने गमावला, अशा शब्दांत डॉ. सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. (Manmohan Singh )
भारताच्या आर्थिक सुधारणांचे नेतृत्व करणारे डॉ. सिंग यांचे गुरुवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या निधनाबद्दल रशिया, चीन आणि अमेरिकेसह विविध राष्ट्रांच्या राजनैतिक प्रतिनिधींनी शुक्रवारी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली. डॉ. सिंग उत्कृष्ट नेते होते. भारताच्या विकासासाठी त्यांनी समर्पित भावनेने काम केले. भारतातील फ्रेंच दूतावासाने, डॉ. सिंग यांच्या नेतृत्वामुळे ‘भारताची जागतिक स्थिती मजबूत झाली आणि फ्रान्ससोबतचे संबंध मजबूत झाले,’असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.(Manmohan Singh )
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी, एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख असलेले डॉ. मनमोहन सिंग हे भारतातील लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाले. त्यांची विद्वत्ता, प्रामाणिकपणा, सभ्यता आणि विनयशीलता वाखाणण्यासारखी होती, अशा शब्दांत मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.
भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी म्हटले आहे की,‘हा भारतासाठी आणि रशियासाठी अत्यंत दुःखाचा क्षण आहे. भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांची विनम्र वर्तणूक नेहमीच प्रिय होती. त्यांची विद्वत्ता, अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची भारताच्या प्रगतीसाठी वचनबद्धता अतुलनीय होती. या कठीण काळात आम्ही डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत आणि भारतीय नागरिकांसोबत आहेत.
अमेरिकन राजदूत एरिक गार्सेटी यांनी सिंग यांचा भारत-अमेरिका संबंधांमध्ये एक ऐतिहासिक अध्याय सुरू करणारा नेता, अशा शब्दांत गौरव केला आहे.(Manmohan Singh )
‘अमेरिकेचे प्रिय मित्र आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निःस्वार्थ योगदानाचे यावेळी स्मरण होते. त्यांनी अमेरिका-भारत संबंधांमध्ये एक ऐतिहासिक अध्याय सुरू केला. भारताच्या विकास आणि समृद्धीसाठी त्यांचे समर्पण आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्व आणि दूरदृष्टीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,’ असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी डॉ. सिंग यांचा ‘सच्चे मित्र’ असा उल्लेख केला आहे. आधुनिक भारताच्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला आहे. डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. भारताची अर्थव्यवस्था भक्कम करण्यात त्यांनी दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही, असे इब्राहिम यांनी म्हटले आहे.
चीनचे राजदूत झू फीहॉन्ग यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, ‘भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले. भारताने एक उत्कृष्ट आणि आदरणीय नेता गमावला. त्यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांप्रति मनापासून संवेदना.’
‘डॉ. मनमोहन सिंग हे जगभरात एक प्रशंसनीय राजकारणी होते. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताची जागतिक स्थिती मजबूत झाली. त्यांच्याच काळात भारत आणि फ्रान्सदरम्यानचे बंध मजबूत झाले. त्यांनी आपला करुणा आणि प्रगतीचा वारसा पुढील पिढ्यांसाठी मागे सोडला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति मनापासून सहवेदना व्यक्त करतो,’ अशा शब्दांत फ्रेंच दूतावासाने त्यांना आदरांजली वाहिली आहे.
It is moment of poignant sorrow and grief for India and for Russia. Dr Manmohan Singh‘s contribution to our bilateral ties was immeasurable. His suave demeanor was always endearing as unquestionable was his expertise as an economist and his commitment to the progress of India. pic.twitter.com/rxjUQsFgj5
— Denis Alipov 🇷🇺 (@AmbRus_India) December 26, 2024
डॉ. मनमोहन सिंग हे ऋजू स्वभावाचे होते. ते मूळचे अभ्यासक आणि प्रशासक होते आणि त्यांची प्रतिमा तशीच होती. त्यांना राजकारण जमत नाही, असा अनेकांचा गैरसमज होता. परंतु अणुकराराच्यावेळी त्यांनी त्याला परस्पर उत्तर देऊन ठेवले आहे. (Manmohan Singh)
तीन पत्रकार परिषदा
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचा काळ होता. भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली होती. मोदी यांनी देशभर हजारोंच्या गर्दीच्या सभांचा धडाका लावला होता. आक्रमक शैली, तिला नाट्यमयतेची जोड आणि विरोधकांबद्दल ओसंडून वाहणारी तुच्छता, तिरस्कार ही मोदींची वैशिष्ट्ये. गुजरातच्या, देशाच्या किंवा कुठल्याही राज्याच्या विकासाच्या आकडेवारीचे आणि इतिहासाचेही चुकीचे संदर्भ देत त्यांची फेकूगिरी सुरू होती. याउलट डॉ. सिंग हे मात्र खूप कमी आणि अपरिहार्य असेल तेव्हाच बोलणारे. दहा वर्षात त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी तीनवेळा संवाद साधला होता. त्यावेळी असे वाटत होते की, मनमोहन सिंग किती कमी बोलतात. परंतु मनमोहन सिंग पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर नरेंद्र मोदी एकदाही पत्रकारांना सामोरे गेलेले नाहीत. याउलट मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या तिन्ही पत्रकार परिषदांमध्ये पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची तपशीलवार उत्तरे दिली होती.
एरव्हीही कमी बोलणारे डॉ. मनमोहन सिंग जे काही सांगायचे, ते बोलण्यापेक्षा कृतीतून यावरच त्यांचा भर राहिला. त्यांच्या सभ्यतेचा, संयमी स्वभावाचा भाजपचे नेते गैरअर्थ काढू लागले होते. सतत त्यांची ‘दुबळे पंतप्रधान’, ‘कमजोर पंतप्रधान’ अशी अवहेलना करीत होते. (Manmohan Singh)
अडवाणींचा समाचार
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या टर्ममध्येही डॉ. सिंग यांच्यावर अशीच टीका केली जात होती. आणि ती टीका करण्यात भाजपचे तत्कालीन लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी आघाडीवर होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला टप्पा संपत आला असताना डॉ. सिंग यांनी अडवाणींना जोरदार वाजवले होते. अडवाणींच्या आयुष्यात कुणी तसे वाजवले नसेल. सभ्य माणसाच्या वाटेत निष्कारण अडथळे आणले तर काय परिणती होते, ते अडवाणींनी त्यावेळी अनुभवले होते.(Manmohan Singh)
कंदहार प्रकरणात भाजपचा “लोहपुरुष’ कसा वितळला होता, याची आठवण करुन देत डॉ. सिंग यांनी अडवाणींच्या दुबळेपणाचा पाढाच वाचला. ‘अडवाणींची आयुष्यभरातील कामगिरी ही बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यापुरतीच आहे’ अशा शब्दात डॉ. सिंग यांनी त्यांना त्याआधीही एकदा सुनावले होते. तरीही अडवाणींनी दुबळेपणाचा राग आळवणे सुरूच ठेवल्यावर ते म्हणाले होते, ‘अडवाणी मला दुबळे पंतप्रधान म्हणून हिणवत असले, तरी त्यांच्याच सरकारच्या कारकीदीर्त विमान अपहरणावेळी ‘जैश-ए-मोहम्मद’च्या म्होरक्यासह तिघा दहशतवाद्यांना सोडण्यात आले. त्यावेळी भाजपचा हा लोहपुरुष वितळला होता. कंदहारच्या वेळी त्यांनी दहशतवाद्यांना सोडले; तर २६/११च्या वेळी आमच्या सरकारने कमांडो धाडून दहशतवादी मारले. हा फरक कोण दुबळा, कोण बलवान, हे सांगण्यास पुरेसा आहे.’
शैलीपेक्षा गाभ्याला महत्त्व
‘संसद हल्ल्याच्या वेळीही एनडीएच्या पोकळ वल्गनांचा पुढचा अध्याय दिसला. त्यावेळी, पाकिस्तानकडून माफी सोडाच, घटना घडल्याचे मान्य करण्यातही त्यांना यश आले नाही. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही दहशतवाद्यांशी वाटाघाटींसाठी आमचे परराष्ट्रमंत्री धाडले नाहीत; उलट कमांडो धाडून नऊ अतिरेक्यांना कंठस्नान घातले… एकाला जिवंत पकडले’, याकडे लक्ष वेधून डॉ. सिंग म्हणाले होते, ‘मी घोषणाखोर नसेन, माझ्या भाषणाच्या भात्यात वाक्प्रचार नसतील, पण कित्येक शतकांची मशीद समाजकंटक पाडत असताना कोपऱ्यात बसून हुंदके देणाऱ्यांपैकी मी नाही. आयुष्यभर मी स्टाइलपेक्षा मूळ गाभ्याला, जनसंपर्कापेक्षा कामगिरी आणि शॉर्टकट्सपेक्षा परिश्रमांना अधिक महत्त्व देत आलो आहे.’
अडवाणींनी दुबळेपणाचा राग असंख्यवेळा आळवला होता आणि डॉ. सिंग यांच्या एकाच फटक्याने सगळे चित्र बदलून गेले होते. सिंग यांचा हल्ला अडवाणी यांच्या एवढा जिव्हारी लागला होता, की काही दिवसांनी संसदेच्या प्रांगणातील समारंभात एकत्र आल्यानंतर डॉ. सिंग यांच्याकडे बघण्याचीही त्यांची हिंमत झाली नव्हती.(Manmohan Singh)
मोदी देशासाठी विनाशकारी
काळाच्या ओघात रा. स्व. संघाने आपला लोहपुरूष अडगळीत टाकला आणि नमोपर्वाचा शंखनाद केला. त्यानंतर नरेंद्रह मोदींचा अश्व असा काही उधळला की, भाजपमधल्या कुणाच्या सोडा, संघाच्याही कुणाच्या हातात त्याचा लगाम येईना. मोदींनी स्वतःचे मार्केटिंग सुरू केल्यानंतर भाजपच्या दुसऱ्या फळीतले अनेक नेते पार दहाव्या क्रमांकाच्या पुढे फेकले गेले. मोदी स्वतःला मनमोहन सिंग यांचे स्पर्धक मानून त्यांच्यावर अनेकदा सभ्यतेचे संकेत झुगारून विखारी टीका करीत राहिले. त्याचा समाचार डॉ. सिंग यांनी मोजक्याच शब्दात घेतला. ‘मोदी पंतप्रधान झाले तर ते देशासाठी विनाशकारी ठरेल.’, असे सांगताना डॉ. सिंग यांनी मोदींचा काळा भूतकाळच समोर उभा केला. ‘अहमदाबादच्या रस्त्यावर निरपराधांचा नरसंहार घडवून आणणे याचा अर्थ सामर्थ्यशाली पंतप्रधान नव्हे,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी केले. डॉ. सिंग यांच्या हल्ल्याने भाजपमधल्या मोदीसमर्थकांचा तिळपापड झाला. सभ्य माणसाच्या विनाकारण वाटेला गेले की काय होते, याचा अनुभव अडवाणींपाठोपाठ मोदी यांनाही यानिमित्ताने आला.
हेही वाचाः
Manmohan Singh भारतीय राजकारणातील सभ्यता निमाली
Atal Bihari Vajpeyee अटल वारसा!
rambhdracharya : भागवत संघाचे नेतृत्व करतात, हिंदू धर्माचे नाही
नवी दिल्ली : भारताला आर्थिक सुधारणांच्या वाटेवर नेऊन भारतीयांसाठी प्रगतीची नवी क्षितिजे खुली करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (वय ९२) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. फुप्फुसातील संसर्गामुळे सायंकाळनंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. सिंग यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळल्यानंतर बेळगाव येथे काँग्रेसच्या अधिवेशनासाठी गेलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले. निधनाच्या वार्तेनंतर काँग्रेसचे अधिवेशनही स्थगित करण्यात आले. (Manmohan singh)
देशाचे चौदावे पंतप्रधान
डॉ.मनमोहन सिंह हे देशाचे चौदावे पंतप्रधान होत. २२ मे २००४ पासून २६ मे २०१४पर्यंत पंतप्रधानपदावर होते. पंतप्रधान होण्याआधी ते १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्याच काळात देशाने जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले, त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रात देशाने लक्षणीय प्रगती केली. त्याचमुळे नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे जनक मानले जाते. (Manmohan singh)
आर्थिक सुधारणांचे जनक
स्वतंत्र भारतच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या १९९१-१९९६ या पाच वर्षांच्या काळात डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थमंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते. हा काळ डॉ. सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन वाणिज्यमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहन सिंग यांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली. तिथून त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने वळण मिळाले आणि ते देशाचे पंतप्रधान बनले. पंडित नेहरूंच्यानंतर सलग पाच वर्षे पंतप्रधानपदी राहणारे ते पहिले पंतप्रधान होते. (Manmohan singh)
डॉ. मनमोहन सिंग हे राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, परंतु राजकारणही खंबीरपणे करीत होते. अणुकराराच्यावेळी भाजपबरोबरच डाव्यांचा विरोध असताना त्यांनी लोकसभेत ज्याप्रमाणे कराराच्या बाजूने बहुमत मिळवले, त्यावरून त्यांच्या राजकीय कौशल्याची प्रचिती आली. मुद्दाम होऊन राजकीय भाष्य न करणारे, परंतु कुणी राजकीय टिप्पणी केली, तर त्याला सडेतोड उत्तर देण्यात ते जराही कुचराई करीत नव्हते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी १९४८साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९६२ साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी. फिल. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी) पदवी संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.
पंजाब विद्यापीठ व प्रथितयश दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉ. सिंग यांची ओळख अधिक ठळक बनली. या काळात युएनसीटीएडी सचिवालयात त्यांनी काही काळ काम पहिले होते. त्यातूनच त्यांची १९८७ आणि १९९० या काळात जीनिव्हा येथील साउथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी १९७१ साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच १९७२ साली त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
त्यांच्या कारकीर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार(१९८७), भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान(१९९५), अर्थ मंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (१९९३ आणि १९९४), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (१९५६), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांनी डॉ. सिंग यांना सन्मानित केले आहे. केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १९९३ मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.(Manmohan singh)
डॉ. सिंग यांनी १९९१ पासून राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून काम केले. १९९८ ते २०००४ या काळात त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली आहे. २००४च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अत्यंत नाट्यमयरित्या डॉ. मनमोहन सिंग यांची भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाली. २२ मे २००९ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
परवाना राज संपवले
डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या डॉ. सिंग यांनी जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण अंमलात आणले. त्यांवेळी त्यांना प्रखर टीकेचा सामना करावा लागला. तथापि, त्यांचे हे धोरण किती दूरदृष्टीचे होते ते आज लक्षात येते. जागतिक मंदीचा सामना अनेक देशांना करावा लागला होता. मात्र डॉ. सिंग यांनी उचललेल्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची फारशी झळ बसली नाही. यावरुन त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येईल.
१९९१ मध्ये, सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून काम करताना परवाना राज संपवले. आर्थिक वाढीतील अडथळे दूर केले. भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक दशकांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी केला. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरण केल्यामुळे विकासाला प्रचंड गती मिळाली.
वेगवान अर्थव्यवस्था बनवण्यात योगदान
पंतप्रधान म्हणून काम करत असतानाही त्यांनी आर्थिक विकासाचे कार्यक्रम सुरूच ठेवले. भारतीय बाजारपेठेच्या वाढीला प्रोत्साहन देणे सुरूच ठेवले. त्यात त्यांना व्यापक यश मिळाले. त्यामुळे त्यांच्याच काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाचा दर८-९ टक्के होता. अर्थमंत्री म्हणून पी. चिदंबरम यांनीही त्यांना चांगली साथ दिली. २००७ मध्ये भारताने ९ टक्के जीडीपी वाढीचा सर्वोच्च दर गाठला आणि जगातील दुसरी सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयाला आला. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर ही अभिमानास्पद ओळख मिळवून देण्यात डॉ. सिंग यांचे प्रमुख योगदान राहिले.
सिंग यांच्या सरकारने वाजपेयी सरकारच्या काळातील सुवर्ण चतुष्कोन योजना पुढे सुरू ठेवत महामार्ग आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू ठेवला. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम केले. वित्त मंत्रालयाने शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जातून मुक्ती देण्याच्या दिशेने काम केले आणि उद्योग-समर्थक धोरणांच्या दिशेने काम केले. सिंग यांच्याच सरकारने विक्रीकराच्या जागी मूल्यवर्धित कर लागू केला.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, शिक्षण हक्क कायदा, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, ओरिसा, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आठ आयआयटीज त्यांच्याच काळात उघडण्यात आल्या. सिंग सरकारने सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमही सुरू ठेवला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.
हेही वाचा :
शाह यांची चूक मान्य करायला मोदी तयार नाहीत