रस्त्यांवरून अनेक खासगी बसेस धावत असतात. राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावत असतात. कधीतरी एखादा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं आढळून येतं. गोंधळ होतो. संबंधित कंपनीला कळवलं जातं. एसटी असेल तर डेपोला कळवलं जातं. ड्रायव्हर बदलून दिला जातो आणि पुढचा प्रवास सुरू होतो. पण ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजे लोको पायलट कोणत्या अवस्थेत आहे, याची आपल्याला खबरबात नसते. ती नसते तेच बरं असतं, कारण दारू पिऊन ट्रेन चालवणा-यांचं प्रमाण भारतात वाढत चाललं असल्याचं भयानक चित्र समोर आलं आहे.
दारू पिऊन एसटी बस चालवली आणि घाटात अपघात झाला, अशी अनेक उदाहरणं पूर्वी घडली आहेत. त्यानंतर मग घाटाच्या एंट्री पॉइंटलाच एसटीनं तपासणी केंद्रं बसवली. तिथं गाडी थांबायची. तिथला माणूस ड्रायव्हर प्यायलाय किंवा नाही हे तपासायचा आणि मग गाडी पुढं जायची. चौपदरी रस्ते तयार झाल्यानंतर हळुहळू हे नाके बंद झाले. समजा तुम्ही टॅक्सीत बसलात आणि लक्षात आलं की ड्रायव्हर दारू प्यायलाय. तुम्ही त्याला थांबवून उतरू शकता. गाडी थांबवली नाही तर ओरडू शकता. पण रेल्वेत असा पर्यायच नाही! ट्रेन कोण चालवतंय, पुरूष आहे की स्त्री आहे, संबंधित व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आहे, याची आपल्याला काही कल्पना नसते. आपण त्याच्या भरवशावर बसलेलो असतो. रस्त्यापेक्षा ट्रेनचा प्रवास सुरक्षित आणि खात्रीचा असा आपला विश्वास असतो.. (Is the train driver drunk)
पण आपल्या या समजाला जबर धक्का देणारी माहिती पुढं आली आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याकडील माहितीच्या आधारे न्यूज लाँड्रीनं त्यासंदर्भातील एक वृत्तांत प्रसिद्ध केलाय.
२७५ लोको पायलटांनी दारु पिऊन रेल्वे चालवली
म्हणजे यासंदर्भातले आकडे ऐकून आपल्या अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. २०२३-२४ या फक्त एका वर्षात सात मोठ्या रेल्वे झोनमध्ये एकूण २७५ लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटनी दारू पिऊन रेल्वे चालवल्याचं आढळून आलं आहे. मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी आरटीआय माध्यमातून ही माहिती मिळवली आहे. एवढंच नाही. तर ६५७ जण दारू पिऊन ड्युटीवर हजर झाले. पण ब्रेथ अॅनालायझर टेस्टमध्ये पकडले गेले. आणि त्यांना ट्रेन चालवण्यापासून रोखण्यात आलं. (Is the train driver drunk)
चंद्रशेखर गौड यांनी २०२३ मध्ये यासंदर्भातली माहिती काढली होती. तेव्हा आधीच्या ५ वर्षांत जवळपास एक हजार लोको पायलट ब्रेथ टेस्टमध्ये फेल झाले होते. हे सगळे आकडे फक्त या ७ झोनचे आहेतः उत्तर पश्चिम, उत्तर मध्य, उत्तर रेल्वे, पूर्व, ईस्ट कोस्ट, दक्षिण आणि पश्चिम रेल्वे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत नव्या गाड्यांना हिरवे झेंडे दाखवत असतात. काहीवेळा लंबी चौडी भाषणंही करतात. पण त्यांच्या भाषणात याची कधी नोंदही नसते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सतत म्हणत असतात की, “प्रवाशांची सुरक्षा आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.” पण दारू पिऊन ट्रेन चालवणा-यांचे हे आकडे वाचल्यावर किंवा ऐकल्यावर व्यवस्था किती बिघडली आहे, याची कल्पना येऊ शकते. (Is the train driver drunk)
दिल्ली सर्वात पुढे
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सर्वाधिक मद्यधुंद इंजिन चालक सापडले आहेत. उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात ७५ लोको पायलट/सहाय्यकांनी दारू पिऊन रेल्वे चालवल्या. १५८ जण दारू पिऊन ड्युटीवर आले, पण टेस्टमध्ये पकडले गेले.
ब्रेथ अॅनालायझर टेस्ट कशी होते?
रेल्वे सोडण्याआधी (साइन-ऑन) आणि गाडी आल्यानंतर (साइन-ऑफ) दोन्ही वेळी ब्रेथ अनालायझर टेस्ट अनिवार्य आहे. म्हणजे ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेवेळी पोलीस जशी तपासणी करीत असतात तशी. लोको पायलटना ड्युटीवर यायच्या आधी किमान अर्धा तास आधी लॉबीत हजर व्हावं लागतं. गाडी घेऊन आल्यानंतर ड्यूटी संपल्यावर परत लॉबीत येऊन साइन-ऑफ करावं लागतं. काहीजण बहुतेक वेळा इंजिनातून उतरल्यावर चहा-नाश्ता करतात. पण त्यासाठी १०-१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. म्हणजे साइन-ऑफला जर कोणी दारूच्या नशेत सापडलं तर याचा अर्थ असा की त्याने लॉबी सोडल्यावर आणि इंजिनात बसण्याच्या काळापर्यंत दारू प्यायली. किंवा इंजिनात बसल्यावर गाडी चालवतानाच प्यायली!
एका रेल्वे कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “साइन-ऑफला जे पकडले जातात, ते लॉबी सोडल्यावर किंवा इंजिनातच दारू पितात. नोकरी जाण्याची एवढी मोठी रिस्क असते, तरी काही जण हे धाडस करतात.”
भोपाळमधील एका ज्येष्ठ लोको पायलटनं सांगितल्यानुसार, “हे लोक हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात घालून सिग्नल, लेव्हल क्रॉसिंग, वळणे, गर्दीचे स्टेशन – सगळं दारूच्या नशेत पार करतात. एक सेकंद उशीर झाला ब्रेकला, एक सिग्नल चुकला, एक झोपेची झापड आली – तर सगळं संपतं! एवढी मोठी जोखीम असतानाही ही मंडळी हजारो प्रवाशांच्या जिवाशी खेळत असतात.
ड्युटी किती तासांची असते?
मेल/एक्स्प्रेस गाड्या – सरासरी ४०० किमी धावतात. तिथे लोको पायलटची ड्यूटी, ११ तास असते. मालगाड्या – ८ तास धावतात. दिवाळी किंवा मोठ्या सणांच्या काळात १५-१६ तासही ड्युटी असते!
शिक्षा काय होते?
यातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणा-या हजारो प्रवाशांच्या जिवाशी खेळणा-या या लोकांना फारशा गंभीर शिक्षेची तरतूदच नाही. एखादा शिक्षक किंवा सरकारी कर्मचारी दारू पिऊन ड्यूटीवर आढळला तर निलंबनाची कारवाई केली जाते. पण रेल्वेकडे मात्र दारू प्यायलेले पकडले तरी फक्त वॉर्निंग दिली जाते. किंवा छोटी चार्जशीट होते. काढून टाकले जात नाहीत. म्हणून कुणाला भीतीच राहिलेली नाही.
२०२३-२४ या वर्षातील दारु पिऊन ट्रेन चालवणा-यांचे विभागनिहाय धक्कादायक आकडे बघा-
दिल्ली विभाग – ७५
हावडा-मालदा-सियालदह (पूर्व रेल्वे) – ७३
लखनौ विभाग – १९ (साइन-ऑफला पकडले)
जयपूर-बिकानेर-जोधपूर-अजमेर – २९
विशाखापट्टणम (ईस्ट कोस्ट) – २४
चेन्नई-तिरुअनंतपुरम – ३७
आग्रा विभाग – ७
मुंबई विभागात मात्र साइन-ऑफला एकही केस नाही (शून्य), पण साइन-ऑनला ११ जण पकडले गेले.
ड्युटीवर येतानाच किती जण पकडले गेले?
दिल्ली + लखनौ – २५७
हावडा + मालदा + सियालदह – १४९
जयपूर + बिकानेर + जोधपूर + अजमेर – १३०
चेन्नई + तिरुअनंतपुरम – ८१
पूर्व किनारा – ४४
आग्रा – १३
मुंबई – ११
धोकादायक चित्र जितके जण साइन-ऑनला पकडले गेले त्यापेक्षा साइन-ऑफला पकडले जाणारे कमी आहेत. पण ते कमी आकडे अधिक भयानक आहेत! कारण त्याचा अर्थ असा की त्या सगळ्यांनी दारू पिऊनच गाडी पूर्ण चालवली होती! तर थोडक्यात असं की, आपण ज्या ट्रेनमध्ये बसलेलो असतो ती कदाचित दारू पिऊन चालवली गेलेली असते. आणि आपल्याला काहीच कल्पना नसते. प्रवाशांची सुरक्षा आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, हे रेल्वेमंत्र्यांचं विधान किती पोकळ आहे, हे या वस्तुस्थितीवरून लक्षात येतं.