बेळगाव : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी लोकेश्वर स्वामीला अटक करण्यात आली. तो बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेकळी गावच्या राममंदिर मठाचा स्वामी आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Swami arrested)
लोकेश्वर स्वामीविरुद्ध पीयुसीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोक्सो कायद्याअंतर्गत स्वामीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुडलगी पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वामीला अटक करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. पीडित मुलगी आणि तिचे वडील हे आश्रमाचे भक्त होते. गेल्या दोन वर्षांपासून ते आश्रमाला नियमित जात होते. (Swami arrested)
पीडित मुलगी कानट्टी मामाच्या गावाला जाऊन गावी परत येत होती. त्यावेळी कारमधून घरी सोडतो म्हणून स्वामीने त्या मुलीला आपल्या कारमध्ये घेतेले, पण मुलीला घरी न सोडता तिला धमकावून रायचूर येथे लॉजवर नेले. तिथे दोन दिवस अत्याचार केले. नंतर बागलकोट येथे नेऊन लॉजवर एक दिवस अत्याचार करून तिला महालिंगपूर गावात सोडले. घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितले तर तुला मारून टाकेन, अशी धमकीही दिली होती. अखेर मुलीने घडला प्रकार घरी सांगितला. त्या नंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. स्वामीला अटक झाली त्यावेळी मठात तलवार, कोयता, जांबिया अशी हत्यारे सापडली. लोकेश्वर स्वामी मटक्याचे नंबरही सांगत असे, त्यामुळे बेळगावच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील लोकही स्वामीकडे मोठ्या संख्येने येत होते. या बाबत ग्रामस्थानी पोलिसांना सांगितले होते पण पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. स्वामीमुळे आमच्या गावाचे नाव बदनाम झाले आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मेकळी ग्रामस्थांनी केली आहे.