मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीची पूजा केली. शहा यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय लालबागचा राजाच्या चरणी लीन झाले. यावेळी शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य भाजप नेत्यांची बैठकही घेतली. (Shah offer prayer at Mumbai)
शहा यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. तसेच धार्मिक विधीही केले. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
शुक्रवारी रात्री शहा मुंबईत आले आणि शनिवारी शिंदे यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईतील राज्य सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी शिंदे यांची भेट घेतली, जिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरचिटणीस अतुल लिमये, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नवनियुक्त मुंबई भाजप प्रमुख अमित साटम यांच्याशी संवाद साधला, असे ‘पीटीआय’ने म्हटले आहे. (Shah offer prayer at Mumbai)
शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ला भेट दिली. त्यानंतर ते त्यांच्या वार्षिक परंपरेचा भाग म्हणून त्यांच्या कुटुंबीयांसह प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश दर्शनासाठी गेले. शहा हे वांद्रे पश्चिम आणि अंधेरी पूर्व येथील गणेश मंडळांनाही भेट देणार आहेत.