कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते कोणाला इशारा देत आहात, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल असे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत यात्रा काढली. ‘भारत जोडो’मध्ये सहभागी झालेल्या ज्या संघटना आहेत त्या कट्टर डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत पाहिली तर समाजात अराजकता पसरवण्याचे काम ते करत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात, संविधानाचा सन्मानच केला पाहिजे, पण मग लाल कव्हर कशासाठी? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
लोकांची मने प्रदूषित करायची, अराजकता माजवायची असाच अर्बन नक्षलवादाचा अर्थ आहे. या माध्यमातून देशातील घटनात्मक संस्था आणि व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडेल, अशा कारवाया करायच्या. सध्या असाच प्रकार भारत जोडोच्या माध्यमातून होत असल्याचे फडणवीस म्हणाले.