कोल्हापूर : प्रतिनिधी : खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघावर ४-० अशा एकतर्फी विजयासह चंद्रकांत चषकावर मोहोर उमटवली. ‘खंडोबा’ने यंदाच्या हंगामातील पहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले या हंगामात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या संयुक्त बुधवार पेठ तालमीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खंडोबाचा आघाडीपटू अमीन खझीरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहूमान मिळाला. विजेत्या खंडोबा तालीम मंडळाला २ लाख ३१ हजार तर उपविजेत्या संयुक्त जुना बुधवार पेठला १ लाख ३१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या बालगोपाल तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. (Khandoba Winner)
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत ‘चंद्रकांत चषक – २०२५’ फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी छत्रपती शाहू स्टेडियमवर हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. खंडोबा आणि जुना बुधवार हे दोन्ही संघ प्रथमच विजेतेपदासाठी आमनेसामने आल्याने विजेतेपद कोण पटकावणार यांची उत्सुकता दोन्ही संघाच्या समर्थकांसह फुटबॉलप्रेमींना लागली होती. सुरुवातीला खंडोबाच्या अमीन खझीरची संधी वाया गेली. १९ व्या मिनिटाला केलेल्या चढाईत पृथ्वीराज साळोखेने दिलेल्या पासवर संकेत मेढेने डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर पहिला गोल करत आघाडी नेले. यानंतर संकेत मेढेने दिलेल्या पासवर अमीन खझीरने जादा वेळेत गोल करून आघाडी २-० अशी भक्कम केली. जुना बुधवारच्या रविराज भोसले, अभिजीत साळोखे, तेजस जाधव, हर्ष जरग, रिंकू सेठ यांनी खोलवर चढाया केल्या. पण समन्वयाअभावी त्यांना गोल करण्यात अपयश आले. खंडोबाच्या ओमकार लायकर व जुना बुधवारच्या सनवीर सिंग यांना नियमबाह्य खेळाबद्दल मुख्य पंच प्रदीप साळोखे यांनी थेट रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर घालविले. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी १० खेळाडूंवर खेळावे लागले. मध्यंत्तरास खंडोबा संघ २-० असा आघाडीवर होता. (Khandoba Winner)

उत्तरार्धात संयुक्त जुना बुधवार कडून आघाडीच्या खेळाडूनी गोल फेडण्यासाठी प्रयन्त सुरु ठेवले . रोहित मंडलिकने मारलेली फ्री किक गोलरक्षकाच्या हातात गेली . एक्सट्रा टाईममधील सहा मिनिटांच्या खेळात खंडोबाने दोन धडाधड गोल नोंदवले. अमिन खझीरच्या रोहित जाधवने संघाचा तिसरा गोल केला. त्यानंतर झालेल्या चढाईत अमीन खझीरने वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. अखेर ४-० ची आघाडी राखत खंडोबाने सामना जिंकून चालू हंगामातील पहिल्या विजेतेपद पटकावले. (Khandoba Winner)

बक्षीस वितरण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर व शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव, मानसिंग खोराटे, संभाजी जाधव,ओंकार जाधव ,राजेंद्र कुरणे, निवास शिंदे, युवराज कुरणे आदी उपस्थित होते. (Khandoba Winner)
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहूमान खंडोबाचा खेळाडू अमीन खझीर याला मिळाला. त्याला रोख ३१ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. तसेच बेस्ट फॉरवर्ड – संकेत मेढे (खंडोबा), बेस्ट हाफ – हर्षा जरग (जुना बुधवार), बेस्ट डिफेन्स – रोमेन सिंग (बालगोपाल), बेस्ट गोलकिपर – देबजीत घोशाल (खंडोबा) यांचा प्रत्येकी ११ हजार रुपये बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.. (Khandoba Winner)
हेही वाचा :