कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर चित्रनगरीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) यांच्या सहकार्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तरुणांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि ऑडिओ-व्हिडिओ यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करणार आहोत. आणि या चित्रपट शिक्षण व्यवस्थेची सुरुवात याच वर्षी होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात जन्मलेल्या आणि कोल्हापूरमध्ये येऊन मराठी सिनेमासाठी कार्य केलेल्या कलाकारांनी मराठी सिनेमाची परंपरा समृद्ध केली असल्याचे सांगून त्यांनी अशा कलाकारांचे कलात्मक दालन (संग्रहालय) चित्रनगरीत उभारण्याची घोषणाही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. कोल्हापूर चित्रनगरीत नव्याने बांधलेल्या विविध इमारतींचे उद्घघाटन मंत्री शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोस्ट प्रोडक्शनसाठी आवश्यक दुमजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले. (Kolhapur Filmcity)
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राची खरी कलानगरी कोल्हापूर असल्याचे सांगून मंत्री अशिष शेलार म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत १९८५ साली सुरू झालेल्या चित्रनगरीसाठी खऱ्या अर्थाने पुन्हा गती देण्याचे कार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नाटक, संगीत, लोककला, लोकवाद्य आणि लोकसंस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे. तशीच मराठी सिनेमा ही महाराष्ट्राची जगभरातील ओळख आहे. या दिशेने काम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला. तत्कालीन अर्थमंत्र्यांनी दिलेला निधी तसेच आता प्रस्तावित असलेल्या १६ कामांसाठी आवश्यक निधी यासाठी आमदार अमल महाडिक यांनी सर्वात मोठा पाठपुरावा केला असून हे त्यांचे यश आहे असेही मंत्री शेलार यांनी सांगितले. (Kolhapur Filmcity)
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीला वास्तविक स्वरूप देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आमदार अमल महाडिक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. इतर विकासकामांबरोबरच चित्रनगरीलाही गती देणे आवश्यक आहे. ही चित्रनगरी पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतील. कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरासाठी ही वास्तू भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने उभी राहील.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, चित्रपटसृष्टीचा व्यवसाय वाढत असून रोजगार संख्याही वाढत आहे, यामुळे कलाकार या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. जिल्ह्यात तयार झालेल्या विविध सुविधा, यामध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि दळणवळणाच्या व्यवस्था यामुळे कोल्हापूरची प्रगती झाली आहे. यामुळे चित्रनगरीचे भविष्यातील महत्त्व निश्चितच वाढणार आहे. आमदार अमल महाडिक यांनी चित्रनगरीच्या उभारणीसाठी अनेक मान्यवरांचे योगदान लाभल्याचे सांगून, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सहकार्याने पुणे, मुंबई यासह रामोजी फिल्म सिटीपेक्षा अधिक चांगली आणि सुसज्ज चित्रनगरी कोल्हापूर येथे उभी राहत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे यांनी केले. (Kolhapur Filmcity)
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन
चित्रनगरीत बांधण्यात आलेले मंदिर (१.४४ कोटी), चित्रीकरणासाठी बांधण्यात आलेला वाडा (४.७० कोटी), चित्रीकरणासाठी आवश्यक चाळ (३.१६ कोटी), चित्रनगरीतील नवीन टॉक-शो स्टुडिओ बांधकाम (५.६९ कोटी), चित्रीकरणासाठी आवश्यक रेल्वे स्टेशन, चित्रीकरणासाठी आलेल्या मनुष्यबळासाठी बांधण्यात आलेले वसतिगृह या इमारतींचे लोकार्पण झाले. तसेच, पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओसाठी दुमजली इमारतीचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या सर्व कामांची एकूण किंमत ४४ कोटी रुपये इतकी आहे. (Kolhapur Filmcity)