कोल्हापूर : प्रतिनिधी : शनिवार पेठेतील खोल खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवास सुरूवात आहे. बुधवारी २६ नोव्हेंबर मुख्य चंपाषष्ठी उत्सव होणार आहे. उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
मार्गशीर्ष प्रतिपदेच्या मुहुर्तावर खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवास सुरूवात झाली. मंदिराचे विश्वस्त खंडेराम जगताप, मेघश्याम जगताप, घनश्याम जगताप यांच्या उपस्थितीत खंडोबा देवाची प्रतिष्ठापना केली. सहा दिवस उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवकाळात सायंकाळी वाघ्या मुरळींच्या खंडोबाच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी खंडोबाचा वार असून मंगळवारी खंडोबाचा जागर आहे. बुधवारी चंपाषष्ठी उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांच्या हस्ते पालखी पूजन होणार आहे. (Khol Khandoba Temple)
असे आहे खोलखंडोबा मंदिर, खोल खंडोबा मंदिर प्राचीन असून ते जमिनीत खोलवर वीस ते पंचवीस फूट आहे. मंदिरात शिवलिंग असून म्हाळसा देवीची मूर्ती आहे. भव्य दगडी शिळावर मंदिर उभारले असून मंदिरावर मुस्लीम शैलीचा घुमट आहे. घुमटावर कमळाचा पाकळ्या आहेत. मंदिर परिसरात बाणाई, हवालदार या देवतांची मंदिर आहेत. पंचगंगेला महापूर आल्यावर मंदिराचा गाभारा नदीच्या पाण्याने भरुन जातो. स्थापत्यतज्ज्ञ आणि अभ्यासक मंदिराला भेट देण्यासाठी येतात. (Khol Khandoba Temple)
केके बॉईज कडून पालखी स्वागताची तयारी परिसरातील केके बॉईजकडून पालखी सोहळा स्वागताची जय्यत तयारी केली आहे. बुरुड गल्ली विठ्ठल मंदिरासमोर भव्य कमान उभारण्यात आली आहे. चंपाषष्ठी दिवशी साउंड आणि लाईट शो चे आयोजन केले आहे. मंगळवार जागरादिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष समर्थ सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, युवराज सांगावकर, हर्षवधन जगताप, गणेश वैद्य, स्वप्निल सांगावकर, राहूल सोनवणे पालखी सोहळा आगमनाची तयारी करत आहेत. (Khol Khandoba Temple)