कोल्हापूर : प्रतिनिधी : कॉ. गोविंद पानसरे यांचे विचार क्रांतिकारी होते. बहुजन कष्टकरी जनतेसाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. सध्याच्या धर्मांध वातावरणात लोकशाही जिवंत ठेवणे म्हणजे कॉ. गोविंद पानसरेंचे विचार जपणे होय, असे प्रतिपादन विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केले.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, निर्मिती विचारमंच, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित बहुजन-कष्टकरी चळवळीचे कामगार नेते, विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘कविता इन्कलाबी’ हा परिवर्तनवादी, प्रागतिक विचारांच्या काव्य मैफलीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. (Kavita Inqalabi)
दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी विद्रोही विचारांच्या कविता सादर केल्या. त्यामध्ये त्यांनी सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना, फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जीभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो, दिवाळीला घर रंगवताना, रंगाचीच फार भीती वाटली, लोक हरामी घराचा रंग बघून, माणसाची जात ठरवतात, म्हणून मी सगळं घरच पांढरशुभ्र केलं, मी जातीला चूना लावला, आणि मी माणसात आलो या कवितेला चांगलीच दाद मिळाली. त्यांनी अनेक विद्रोही कविता सादर केल्या.
कवी व दिग्दर्शक अनिल म्हमाने यांनी गोविंद पानसरे यांना अभिवादन करत कविता सादर केली. अण्णा म्हणजे कॉम्रेड, कष्टकरी चळवळीचे कार्यकर्ते, नेते, दिशादर्शक विचारवंत, परिवर्तनाच्या चळवळीचा झंजावात म्हणजे अण्णा, आपला जिवाभावाचा मोठा भाऊ म्हणजे अण्णा. अण्णा आमचा बाप, तुम्ही, आमच्या बापाला मारून आम्हाला पोरकं केलं, बापाला मारलं म्हणजे आम्ही घाबरू, किती मोठा गैरसमज, खरं आहे, आमच्या बापाला तुम्ही शरीराने संपवलं , पण तुम्हाला संपवता आला नाही, त्यांचा विचार, अण्णा जिवंत आहेत, आजही माझ्यात, तुमच्यात, आपल्या सर्वांच्यात, एक क्रांतिकारी विचारशक्ती बनून. ही कविता म्हमाने यांनी सादर केली. (Kavita Inqalabi)
आंबेडकरवादी कवी व शाहीर रणजित कांबळे म्हणाले, चळवळ हा केवळ गप्पा मारायचा विषय नाही तर तो आता जगण्या-मरण्याचा विषय झाला आहे. त्यामुळे विचारधारेशी ठाम असणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, गंगाधर म्हमाने अर्हंत मिणचेकर, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह भरत लाटकर, सुनील जाधव, डॉ. कपिल राजहंस, सुरेश केसरकर, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, व्यंकाप्पा भोसले, संजय अर्दाळकर, मिलिंद यादव, दयानंद ठाणेकर, कॉ. दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kavita Inqalabi)
स्वागत सुरेश केसरकर यांनी तर प्रास्ताविक डॉ. कपिल राजहंस यांनी केले. ॲड. करुणा विमल यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर, अर्हंत मिणचेकर यांनी केले.