कोल्हापूर : मारुती फाळके : हल्ली विवाह म्हटलं की भरमसाठ खर्च..भव्य डामडौल.. वर आणि वधू पक्षांकडील मंडळींची हौस-मौज असा आनंदाचा उत्सव असतो. पण या सगळ्या गोष्टींना फाटा देत शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील अनिल कांबळे आणि स्नेहा चौधरी यांनी अनाथालयात सत्यशोधक पध्दतीने लग्न केले.(Satyashodhak marriage)
लग्नाला समाजात प्रबोधन करणाऱ्या साहित्यपर आहेराचा स्वीकार केला. सॅनिटरी नॅपकिन ग्रामीण भागासाठी व शैक्षणिक साहित्य अनाथलयाला भेट दिले. पुरोगामी विचारांची कास धरत विधायक पध्दतीने विवाह करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
अनिल कांबळे व स्नेहा चौधरी दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत. कांबळे हे शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम नांदारी धनगरवाडा आणि स्नेहा चौधरी या वारूळ पैकी कांबळेवाडी शाळेत शिक्षण सेविका आहेत. स्नेहा चौधरी या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील किटाळी, ता. चिमूर इथल्या. त्यांच्यावर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव. (Satyashodhak marriage)
अनिल कांबळे हे सुद्धा याच मुशीतले कार्यकर्ते. उपक्रमशील-आदर्श शिक्षक,अनेक पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय लघुचित्रपटांचे पारितोषिक विजेते.शासनाच्या वेगवेगळ्या स्पर्धेत सन्मान मिळवलेले शिक्षक. स्वतः सामाजिक कार्यकर्ते.. धनगरवाडे-वंचित-शोषित-उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी काम करणारा अवलिया शिक्षक.
दोघांची ओळख नवनियुक्त प्रशिक्षणातून झाली..ओळखीचे रूपांतर.. विचारांत झाले..आणि दोघांचे भावविश्व जुळले..परिवर्तनवादी चळवळीत काम करण्याचा दोघांचाही पिंड..या ओळखीला शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांचा आशीर्वाद लाभला आणि दोघांच्याही जीवनाचे सूत जुळले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला लग्न करायचे असा दोघांनीही विचार प्रत्यक्ष कृतीत आणला. (Satyashodhak marriage)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कांबळे दाम्पत्याच्या सहजीवनाला सुरुवात झाली. दोघांच्याही घरची संमती घेऊन सत्यशोधकी पद्धतीने विवाह विधीवत पार पडला. तो ही शून्य खर्चात. आणि हा सारा सोहळा घडवून आणला शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी. त्यांच्या पुढाकारातून हा सोहळा बालकांचा अनाथाश्रम असलेल्या रामनगर-शिये, ता. करवीर इथल्या करुणालय बालगृह शतजन्माच्या गाठी जुळल्या.
गटशिक्षणाधिकारी सुतार व त्यांच्या पत्नी वैशाली सुतार यांनी वधू स्नेहा चौधरीचे पालकत्व निभावलं.
या अनोख्या विवाह सोहळयात व्हराडी बनले होते, प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, डॉ. प्रविण चौगले, ‘अंनिस’चे कृष्णात कोरे, वैशाली सुतार सगळेच परिवर्तनवादी विचाराने भारावलेले. (Satyashodhak marriage)
कृष्णात कोरे व वैशाली सुतार यांनी पुरोहित म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे या नवदाम्पत्याने अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करताना ‘करुणालय बालगृह’ मधील विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाचा आनंद देऊन व या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, सॅनिटरी नॅपकिन आदी शैक्षणिक व नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करून एक आदर्श व अनुकरणीय विवाह सोहळा संपन्न केला.
हेही वाचा :
कुणाल कामराला अटक करता येणार नाही
नागपूर महापालिकेची कोर्टासमोर बिनशर्त माफी