नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (२४ जुलै) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमाआधी फडणवीस यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनेने तीव्र निदर्शने केली. (Protest against CM in JNU)
‘वापस जाओ, वापस जाओ…,’ अशा घोषणा देत जेएनयूतील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयांना विशेषत: जनसुरक्षा विधेयकाला यावेळी विरोध दर्शवण्यात आला. तसेच हे विधेयक मागे घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार चालणार नाही, असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जेएनयूसारख्या विद्यापीठात अशा लोकांना स्थान नाही. तिरस्कार पसरवणाऱ्या आणि समाजात विष कालवणाऱ्या लोकांना स्थान नाही, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. (Protest against CM in JNU)
त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून राज्य सरकार लादत असलेल्या हिंदी सक्तीलाही यावेळी तीव्र विरोध करण्यात आला. भाजपाचे लोक सांगतात म्हणून महाराष्ट्रात हिंदी भाषा लादली जात असेल तर आम्ही गप्प कशासाठी बसायचे, असा सवाल करत विद्यार्थ्यांनी हिंदीविरोधात जोरदार इशारा दिला. महाराष्ट्र सरकारच्यावतीने विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. (Protest against CM in JNU)
कार्यक्रम सुरळीत
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते आयोजित केलेले कार्यक्रम यावेळी सुरळीत पार पडले. जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राची कोनशिला फडणवीस यांच्याहस्ते बसविण्यात आली. तसेच कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उदघाटनही करण्यात आले.