नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला. शेळके यांचा घात की अपघात अशी चर्चा सुरू झाली आहे. जितेंद्र शेळके हे खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलगाही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जितेंद्र शेळके कुटुंबियासमवेत छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीला जात असताना अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावाजवळ कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामध्ये शेळके व त्यांची पत्नी अनुराधाही हे दोघे जागीच ठार झाला. त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी मोठी होती की कार थेट कंटेनरखाली घुसली आणि कारचा चुराडा झाला. (Jitendra Shelke dies in an accident)
जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरात यांचे जवळचे सहकारी होते. ते खरात यांच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. एसआयटीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यांची जवळपास चार वेळा चौकशी झाली असल्याची माहिती पुढे आले होते. शेळके यांच्या काही मालमत्त्तही त्यांची भागीदारी होती. खरातला अटक झाल्याने शेळके प्रचंड तणावाखाली होती. त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने अपघात की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे. जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी शंका व्यक्त केली आहे. (Jitendra Shelke dies in an accident)
अपघात घडवून आणला?
आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, “शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी.” (Jitendra Shelke dies in an accident)
हा अपघात असूच शकत नाही
अंजली दमानियांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की , “जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर नंबर दोन पोज़िशन वर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर ह्याच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची ईडी चौकशी झाली आणि आज ते अपघातात वारले ? हा अपघात असूच शकत नाही.” (Jitendra Shelke dies in an accident)
अशोक खरातचे एन्काऊंटर होऊ शकतो
सुषमा अंधारे म्हणाल्या, “अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरे तर अविश्वसनीय वाटते. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती किंवा शक्यता व्यक्त केली होती की, अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. आजच्या घटनेमुळे ही शक्यता अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. कदाचित खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नयेत असे काही लोकांना वाटत आहे का? असे असले तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल, या लोकांच्या चौकशा होत नसतील, तर अजून जास्त संशयाचे धूके वाढत आहे.”
“जितेंद्र शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवले असते. शिक्षा कायदा देईल. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण जी घटना आज घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की,” असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
अपघात कसा घडला हे न सुटणारे कोडं
अमोल मिटकरी म्हणाले, “जितेंद्र शेळके हा भोंदू अशोक खरात चा निकटवर्तीय होता.दोन दिवसांपूर्वी त्याची ईडी चौकशी झाल्याचे समजले. आता काही तासांपूर्वी समृद्धी महामार्गावर त्याचा दुर्दैवी अपघाती मृत्य झाला व कुटुंबीय गंभीर जखमी झाले ही घटना दुर्दैवी असून नेमका याच व्यक्तीचा अपघात कसा झाला हे मात्र न सुटणारं कोडं आहे. (Jitendra Shelke dies in an accident)