श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी आज (दि.१६) ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि ‘इंडिया’ आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. (Omar Abdullah)
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत ‘नॅशनल कॉन्फरन्स’ पक्षाला यश मिळाले. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर ओमर अब्दुल्ला हे जम्मू- काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. आज शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते सुरिंदर कुमार चौधरी यांनी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते सकिना इटू, जावेद अहमद राणा, जावेद अहमद दार आणि अपक्ष आमदार सतीश शर्मा यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. (Omar Abdullah)
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने मिळून ही निवडणूक लढवली होती; पण काँग्रेस नवीन जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये सहभागी झालेले नाही. काँग्रेसने नवीन सरकारमध्ये एका मंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे. जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख तारिक हमीद कारा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आज सांगितले, की काँग्रेस पक्ष सध्यातरी जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये सहभाग होणार नाही. काँग्रेसने केंद्र सरकारकडे जम्मू आणि काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय पंतप्रधानांनी जाहीर सभांमध्ये तसे आश्वासनही दिले आहे; पण जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. यामुळे आम्ही नाराज असून आम्ही सध्यातरी सरकारमध्ये सामील होणार नाही. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी नेहमी लढत राहील, असे कारा यांनी म्हटले आहे.
शपथविधी सोहळ्याआधी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना, ओमर म्हणाले, “आम्हाला खूप काही करायचे आहे. त्यांचे सरकार जम्मू- काश्मीरमधील लोकांच्या तक्रारी जाणून घेईल. आम्ही लोकांना विश्वास दिला पाहिजे, की हे त्यांचे सरकार आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेईल. गेल्या ५-६ वर्षांपासून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात नव्हत्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करणे ही आमची जबाबदारी असेल.”
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत, ‘नॅशनल कॉन्फरन्स’ने (एनसी) ९० पैकी ४२ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या. आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या एका आमदाराने आणि पाच अपक्षांनी अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे.
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी
‘नॅशनल कॉन्फरन्स’ विधिमंडळ पक्षाने अब्दुल्ला यांची पक्षनेतेपदी निवड केली होती. आता ते मुख्यमंत्रिपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. त्यांनी २००९ ते २०१४ दरम्यान ‘नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्या वेळी जम्मू- काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा होता.
I’m back. pic.twitter.com/dJ2TFiFRCn
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 16, 2024
हेही वाचा :