नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) बुधवारी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (आयएसएस) २०२६ च्या परिक्षांसाठी अधिसूचना जारी केली आहे. नागरी सेवा परीक्षेसाठी ९३३ तर भारतीय परराष्ट्र सेवासाठी ८० पदांची घोषणा केली आहे. या परीक्षेसाठी २४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. मागील परीक्षेच्या आधारे आयपीएसमध्ये निवडलेले किंवा नियुक्त झालेले उमेदवार सीएसई २०२६ च्या निकालाच्या आधारे आयपीएसमध्ये पुन्हा प्रयत्न करू शकणार नाहीत, असा नियमात बदल करण्यात आला आहे. (UPSC changes the rules)
परीक्षेसाठी युपीएससीकडून बदल करण्यात आले आहेत. यावेळी परीक्षेला फेस ऑथिंटिकेशननंतरच उमेदवारांना केंद्रात प्रवेश मिळणार आहे. तसेच युपीएससी परीक्षेसाठी प्रयत्न मर्यादा आणि पात्रता निकषामध्येही बदल करण्यात आले आहेत. यूपीएससीच्या अधिसूचनेनुसार जर एखाद्या उमेदवाराची मागील नागरी सेवा परीक्षेच्या निकालांच्या आधारे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) किंवा भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) मध्ये नियुक्ती झाली असेल आणि तो अजूनही त्या सेवेत सेवा करत असेल, तर तो उमेदवार २०२६ च्या नागरी सेवा परीक्षासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. त्याचप्रमाणे, जर एखाद्या उमेदवाराची २०२६ च्या प्राथमिक परीक्षेनंतर आयएएस किंवा आयएफएसमध्ये नियुक्ती झाली असेल आणि तो सेवेत राहिला असेल, तर तो २०२६ च्या मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र राहणार नाही. जरी तो प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तरी. याशिवाय जर उमेदवार २०२६च्या मुख्य परीक्षेनंतर आयएएस किंवा आयएफएसमध्ये नियुक्त झाला असेल, परंतु आयोगाकडून अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी तो सेवेत राहिला असेल, तर अशा उमेदवाराचा सीएसई २०२६ च्या निकालाच्या आधारे कोणत्याही सेवेत किंवा पदावर नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. याचा अर्थ असा की, तो उमेदवार सेवेत असताना पुन्हा निवडीसाठी पात्र राहणार नाही. (UPSC changes the rules)