तत्त्वज्ञानाने जगाचा अर्थ लावता येतो पण मुद्दा आहे तो जग बदलण्याचा. जग बदलायचे असेल तर घाव हा घालवाच लागतो. संघर्ष अटळ असतो. त्यासाठी परिणामाची तमा न बाळगता सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची तयारी असावी लागते. अशा संघर्षाची महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे. त्यांच्या संघर्षातूनच आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा राहिला आहे. अशा संघर्षशील व्यक्तींपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे डॉ. भारत पाटणकर. त्यांचा आज (५ सप्टेबर) वाढदिवस. त्यानिमित्त… (Comrade Bharat Patankar)
-कॉम्रेड संपत देसाई
गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ डॉ. भारत पाटणकर त्यांच्या सहचारिणी, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, विदुषी डॉ. गेल ऑम्वेट यांच्यासोबत दलित आदिवासी, श्रमिक कष्टकरी, बहुजन स्त्री-पुरुषांच्या मुक्तीदायी राजकारणात सक्रिय आहेत.
डॉ. पाटणकर यांना संघर्षाचा वारसा त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला आहे. देशभक्त दिनकरराव निकम हे त्यांचे आजोबा तर प्रतिसरकारच्या सशस्त्र दलात सक्रिय असणाऱ्या क्रांतिवीरांगना इंदूताई पाटणकर आणि क्रांतिवीर बाबुजी पाटणकर हे त्यांचे आईवडील. बाबूजी पाटणकर यांच्या राजकीय हत्येनंतर इंदूताईंनी डॉ. पाटणकर यांना अनेक संकटांना सामोरे जात वाढवले. इतकेच नव्हे तर त्यांना क्रांतिकारक विचारांचे बाळकडूही दिले.
एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमडी होण्यासाठी डॉ. भारत पाटणकर मुंबईला गेले. आधीच धगधगत्या क्रांतिकारक विचारांचा वारसा मिळालेला हा तरुण मागोवा या क्रांतिकारक गटाच्या संपर्कात आला. श्रमिकांच्या चळवळीचा पूर्णवेळ कार्यकर्ता बनला. गिरणी कामगारांच्या लढ्यात सक्रिय झाला. क्रांतिबा जोतिबा फुले सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून कामगारवर्गाला नवे सांस्कृतिक भान देऊ लागला. (Comrade Bharat Patankar)
याच दरम्यान डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप सुरू झाला. गावाकडे जगता येत नाही म्हणून मुंबईला गेलेला कामगार गावी परतला, या कामगारांना संघटित करण्यासाठी डॉ. पाटणकर गावी परतले. सांगली- सातारा भागातील दुष्काळी जनतेच्या संपर्कात आले, गावाकडे जमिनीला हक्काचे पाणी मिळाले असते तर कदाचित कामगार म्हणून मुंबईला जाऊन चाळीत वा झोपडपट्टीत राहून जगण्याची वेळ आली नसती, किमान सुखाने जगता येईल इतके उत्पादन देणारे हक्काचे बारमाही पाणी शेतीला मिळाले तर दुष्काळी भागातील स्थलांतर थांबवता येईल हे या तरुणाच्या लक्षात आले. इथेच दुष्काळ निर्मूलनाची चळवळ उभी राहिली. महात्मा फुलेंचे पाणी धोरण अधिक विकसित करीत या तरुणाने समन्यायी पाणी वाटपाची चळवळ टोकदार बनवली. फुलेंच्या खांद्यावर उभा राहत हा तरुण पाणी चळवळीचा अभ्यासू नेता बनला. (Comrade Bharat Patankar)
या देशातील शेतकऱ्यांनी बांधलेले पहिले धरण म्हणजे बळीराजा धरण. या धरणाच्या लढ्यातून दुष्काळ निर्मूलनाचे, समन्यायी पाणी वाटपाचे एक नवे तत्त्व पुढे आले. भूमिहीनांसह शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच कुटुंबांना बंद पाईपने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी देणारा समन्यायी पाणी वाटप प्रकल्प अस्तित्वात आला. आज आटपाडी या दुष्काळी तालुक्यात बंद पाईपने जे पाणी पोहचत आहे त्यामध्ये डॉ. भारत पाटणकर यांचा मोठा वाटा राहिला आहे. नव्हे त्याचे संपूर्ण श्रेय हे क्रांतिवीर नागनाथअण्णा आणि डॉ. भारत पाटणकर यांनाच द्यावे लागेल.
पुनर्वसनाचा विकसीत कायदा
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रासह देशात सिंचनासाठी अनेक धरणे बांधली गेली. विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंबे विस्थापित झाली. विस्थापितांचे न्याय्य पुनर्वसन झाले पाहिजे अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रात पुनर्वसनाची चळवळ उभी राहिली. या चळवळीने महाराष्ट्र शासनाला पुनर्वसनाचा कायदा करायला भाग पाडले. पुढे हा कायदा अधिक विकसित होत गेला. कोल्हापूर-सांगली साताऱ्यासह कोकण, मराठवाडा आणि खान्देशातील धरणग्रस्तांना संघटित करत पाटणकर यांनी पुनर्वसनाच्या लढ्याला वेगळी ओळख दिली. ‘‘आधी पुनर्वसन मगच धरण/प्रकल्प’’ अशी भूमिका घेत निर्णायक संघर्ष केला. या संघर्षातून आजचा पुनर्वसनाचा विकसीत कायदा जन्माला आला. (Comrade Bharat Patankar)
पर्यायी विकासनीती
निसर्गाला ओरबाडून उद्ध्वस्त करणारे भांडवली विकासाचे अक्राळविक्राळ रूप आज आपण पाहत आहोत. जल, जंगल, जमीन, नद्या, नाले, डोंगर, पर्वत, समुद्र विकासाच्या नावाखाली क्रूरपणे ओरबडले जात आहेत. अशावेळी विरोधाला विरोध न करता पर्यायी विकासाची भूमिका मांडत पाटणकर आणि श्रमिक मुक्ती दलाने भांडवलंदारांचा पराभव करणारा निर्णायक संघर्ष केला आहे. अलिबाग येथील टाटा रिलायन्सच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला विरोध करताना ब्ल्यू ग्रीन एमआयडीसीची नवी कल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने तेथील चळवळीची वाटचाल सुरू केली आहे.
सांस्कृतिक पुनर्मांडणी
समतेवर आधारलेला नवा समाज आणायचा असेल तर भौतिक चळवळीबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही आपला हस्तक्षेप राहिला पाहिजे हे ओळखून श्रमिक मुक्ती दल आणि पाटणकर यांनी सांस्कृतिक लढ्यालाही तितकेच महत्व दिले आहे. दलित आदिवासी, बहुजन कष्टकरी स्त्री पुरुषांच्या बाजूने पाटणकर नेहमीच हस्तक्षेपाची भूमिका घेत आले आहेत. महात्मा फुलेंनी पर्यायी सांस्कृतिक उत्सवाची मांडलेली भूमिका विकसित केली. ‘‘आम्ही आमचे ग्रंथ निर्माण करू आणि आम्ही आमच्या ग्रंथकार सभा भरवू,’’ अशी भूमिका घेऊन साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात उभा राहिलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका ठरविण्यात पाटणकर यांचा मोठा वाटा राहिला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या नेतृत्वाखाली बडवे उत्पात हटाव आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाने जात वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या बडव्यांच्या अधिकाराला आव्हान दिले. भेदाभेद अमंगळ मानणाऱ्या श्री विठ्ठलाच्या मंदिरात हा भेद का असा खडा सवाल विचारला. या लढ्यात पाटणकर नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.
भारतीय समाज हा जातीव्यवस्थांक आहे. इथे सातत्याने जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहे. त्याला विरोध केलाच पाहिजे पण तिथेच न थांबता जातीअंताची चळवळ तीव्र केली पाहिजे अशी भूमिका मांडून जातीअंताच्या परिषदा संघटित करण्यात ते नेहमीच पुढाकारात राहिले आहेत. जातीचा प्रश्न जसा सांस्कृतिक आहे तसाच तो भौतिक पण आहे हे ओळखून त्यांनी जातीअंताची लढाई भौतिक प्रश्नांच्या लढ्याशी जोडली.
कष्टकरी श्रमिक जनतेचे लढे लढवत असतानाच पाटणकर यांनी सिद्धांत आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. मार्क्सच्या विश्लेषण पध्दतीला फुले-आंबेडकर, स्त्री-मुक्ती चळवळ, पर्यावरणवादी चळवळ यांनी पुढे आणलेल्या सैद्धांतिक योगदानाची जोड देत शास्त्रीय समाजवादाची नवी मांडणीही त्यांनी केली आहे. मुद्दा आहे जग बदलण्याचा, पर्यायी विकासनीती, महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष, हिंदू की सिंधू, मुक्त अर्थव्यवस्था आणि वर्गीय, जातीय, लैंगिक शोषण, क्रांतिसिंह नाना पाटील यासह अनेक पुस्तकातून त्यांनी मूलभूत वैचारिक मांडणीही केली आहे. आज धर्मांध जातीयवादी शक्ती हिंसक बनली आहे. फॅसिझम आपल्या दारात येऊन उभा राहिला आहे. अनेकांनी शरणागती पत्करली आहे, पण डॉ. भारत पाटणकर वयाच्या पंच्याहत्तरीतही फॅसिझमविरोधात घट्ट पाय रोवून ठामपणे लढायला उभे राहिले आहेत. लेखक, कवी, कलावंत, विचारवंत, कार्यकर्ता-नेता आणि कुशल संघटक, योध्दा कॉम्रेड असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व. आज त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
(कार्याध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल)